सेपिअन्सची कुळकथा!

आपण एक वाक्य लहानपणापासून ऐकतो ते म्हणजे मनुष्य हा एक प्राणी आहे. असं असेल तर इतर प्राण्यासारखं आपल्यात काय आहे? आपली उत्क्रांती झाली म्हणजे नेमकं काय झालं? आपण हे आधुनिक जग निर्माण केलं याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. पण ह्या निर्मितीमागे आपण काय काय गमावलंय? आपणही या जगाचा हिस्सा आहोत आणि या पृथ्वीवर आपला हक्क नसून आपण फक्त इथल्या जीवसृष्टीचा एक घटक आहोत हे आपण साफ विसरलो. या आणि इतर प्रश्नांवर तटस्थपणे आपल्याला पाहता येईल का? असा जर प्रश्न मनात आला तर ‘सेपिअन्स‘ हे पुस्तक नक्कीच वाचावं. आपले विचार, आपला इतिहास, आपली श्रद्धा, धर्म, या सगळ्या बाबी आणि जीवविज्ञान यांचा काही संबंध असू शकतो असा एक पुर्णपणे पठडीबाहेरचा विचार या पुस्तकातून समोर येतो आणि बऱ्याच अंशी आपल्या मान्यतांना हे पुस्तक आव्हान देत. मानवाने आपली सेपिअन्स ही ओळख कशी पुसली आणि आज परिस्थिती अशी आहे की तीच ओळख नव्याने आपल्याला करून घ्यावी लागेल. आपला स्वतःचा इतिहास इतका क्लिष्ट, उत्कंठावर्धक आणि जीवविज्ञानकेंद्रित आहे ही गोष्ट हे पुस्तक वाचताना समजते. पुस्तकातल्या सगळ्याच गोष्टी पटत नसल्या तरी एकदम नवीन दृष्टिकोनातून मांडल्या आहेत आणि त्यामुळेच डॉ युव्हाल हरारी ह्या हिब्रू विद्यापीठातील एका इतिहासाच्या प्राध्यापकाने लिहिलेलं हे पुस्तक Must read असंच आहे.

पुस्तकाची मांडणी ही मानवाची उत्पत्ती आणि उत्क्रांती इथून सुरू होते. मानववंशशास्त्र ही गेल्या काही वर्षात थोडीशी दुर्लक्षित शाखा! ती दुर्लक्षित का झाली हे पुढच्या लेखांमध्ये कळून येतं. आपल्या समजुतीला किंवा माहितीला पहिला धक्का तेव्हा पोचतो जेव्हा आपण हे वाचतो की मानवाची उत्क्रांती एका सरळ रेषेत झाली नाही. म्हणजेच एकापासून दुसरा, दुसर्यापासून तिसरा आणि मग आजचा आधुनिक मानव. याउलट पृथ्वीवर विविध ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता आणि वैशिष्ट्य असलेला मानव एकाच वेळी अस्तित्वात होता. 1 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानवाच्या 6 भिन्न प्रजाती अस्तित्वात होत्या. सर्वांमध्ये काही बाबी सामायिक होत्या. जसं की भटकी वृत्ती, टोळ्या करून राहणे, इत्यादी. ह्या सर्व प्रजाती सतत भटकत असत. पण इतर सर्वांपेक्षा सेपिअन्स हे जास्त जागा बदलत. त्याकाळात मानव हा अन्नसाखळीत मधल्या पातळीवरचा घटक होता. लेखकाच्या म्हणण्यानुसार तेव्हापासूनच सेपिअन्स हे महत्वकांक्षी. इतर कुठल्याही प्रजातीपेक्षा सेपिअन्स यांनी सामाजिक कौशल्य जास्त वेगाने विकसित केली. सेपिअन्स आणि इतर प्रजातींमध्ये जगण्यासाठी संघर्ष देखील व्हायचा. परंतु तुलनेने विकसित सामाजिक कौशल्याच्या बळावर सेपिअन्स हे हळूहळू जिंकत गेले. त्यांचा सर्वात अधिक काळ संघर्ष हा निअंडरथल ह्या प्रजातीबरोबर झाला. ही प्रजाती देखील सेपिअन्सच्या तोडीस तोड विकसित होती पण सेपिअन्स हे त्यांच्यापेक्षा सरस ठरले. याचा सोपा पुरावा म्हणजे आज सेपिअन्स अस्तित्वात आहेत आणि निअंडरथल नाहीत. या दोन प्रजातींमध्ये प्रजनन झाल्याचं काही शास्त्रज्ञ मानतात पण ह्याच प्रमाण अगदीच नगण्य आहे हे अनुवंश शास्त्राने सिद्ध केलं आहे. त्यामुळे सेपिअन्स ह्या संघर्षात जिंकले हेच मानल्या जातं.

यापुढच्या भागात डॉ युव्हाल सेपिअन्सला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. त्यांचा म्हणणं अस आहे की इतर 5 प्रजाती नामशेष झाल्यानंतर सेपिअन्स लोकांनी हळूहळू इतर पृथ्वी पादाक्रांत केली ते अगदी ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन पोचले. त्याआधी ते मध्यपूर्वे युरोप मध्ये भटकत होते. इथेच त्यांचा संघर्ष निअंडरथल सोबत अनेक वर्षे चालला होता. पण त्याकाळात मध्य युरोप मधून थेट ऑस्ट्रेलियात सेपिअन्स गेले कसे हे मात्र ते स्पष्ट करत नाहीत. पुढचा आरोप म्हणजे तिथे गेल्यावर तिथली समृद्ध अशी जीवसंपदा सेपिअन्सच्या हस्तक्षेपामुळे नष्ट झाली. ह्या आरोपाला अर्थात कुठलाही ठोस पुरावा नाही. खरं म्हणजे ऑस्ट्रेलिया हा खंड इतर खंडांपासून भौगोलिक दृष्ट्या खूप वेगळ्या ठिकाणी एकाकी असा आहे त्यामुळे तिथली जीवसंपदा ही पूर्वीपासूनच स्वतंत्रपणे विकसित होत गेली तसेच हवामान बदल, हिमयुग या कारणामुळे तिथले जीव नामशेष झाले या निष्कर्षावर बहुतेक जीवशास्त्रज्ञ, उत्क्रांतीचा अभ्यास करणारे तसेच हवामान विशेषज्ञ यांचं एकमत आहे. पण लेखकाच्या या मताला कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्यामुळे मान्य करता येणं अवघड आहे. पहिल्या भागात सेपिअन्सनी पृथ्वी कशी पादाक्रांत केली हे विस्तृत स्वरूपात येत. आपल्या संघटन आणि सामाजिक कौशल्यं यांच्या बळावर मोठमोठ्या प्राण्यांच्या शिकारी करून मानव कसा जगला याच वैज्ञानिक वर्णन खूप छान प्रकारे लेखकाने केलं आहे. पण एक बाब राहून गेली आहे असं मला वाटतं. पृथ्वीवर असणारा जीवसृष्टीचा एक मोठा कालखंड डायनासोर या महाकाय प्राण्यांनी व्यापला होता हे आपल्याला माहिती आहे. तरीदेखील सेपिअन्स आणि डायनासोर यांचा संघर्ष झाला का?असेल तर कसा?तिथे नेमकं काय झालं असेल याचा कुठेच उल्लेख येत नाही. डायनासोर आणि मानव एकाच वेळी पृथ्वीवर अस्तित्वात होते का?आणि असतील तर फक्त दगडांची हत्यारं वापरून आणि टोळ्यांनी हल्ला करून मानवाने या महाकाय प्राण्याचा कसा मुकाबला केला याची माहिती या पुस्तकात असणं गरजेचं आहे. आणखी एक नवीन विश्लेषण लेखक करतो ते म्हणजे सेपिअन्सची काल्पनिक कथा रचण्याची क्षमता. ह्या क्षमतेमुळे सेपिअन्स काही सामायिक श्रद्धास्थानं निर्माण करू शकले. त्यामुळे सामाजिकरित्या आपण एकत्र राहू शकलो आणि आपलं वर्चस्व निर्माण करणं शक्य झालं. या काल्पनिक कथांना पुराकथा असं म्हणतात. इतर कुठल्याही प्रजातींनी हा अनोखा मार्ग अवलंबला नाही. त्यामुळे अगदी त्याकाळात देखील नेतृत्व कौशल्य दाखवून आणि पुराकथा रचून सेपिअन्स यशस्वी ठरले. या पुराकथाच पुढे जाऊन धर्म संकल्पनेत रूपांतरित झाल्या असा दावा लेखकाचा आहे. नेमका हाच तो टप्पा आहे जिथे आपण नैसर्गिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून बाहेर पडायला सुरुवात केली.

यानंतरच्या भागात येते ती शेतीची सुरुवात कशी झाली आणि त्याचा काय परिणाम झाला याच विश्लेषण. आपण हे मानतो की शेतीचा शोध हा आपल्या प्रगतीचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे पण लेखक ह्या शोधाला एक फसवणूक मानतो. हजारो वर्षे आपण शिकारी म्हणून विकसित होत होतो. आपलं शरीर देखील त्यालाच सरावलं होतं परंतु शेतीसाठी आपल्याला खूप जास्त कष्ट करावे लागले. अशा कष्टांसाठी आपल्या शरीराची रचना विकसित नव्हती. ती करण्याच्या नादात आपल्या मागे पाठीच्या कण्याचे विकार लागले. शिकारी असताना आपल्या अन्नात विविधता होती. आपलं अन्न जास्त पोषक होतं. परंतु शेतीमुळे आपण एकाच प्रकारचं अन्न खायला लागलो त्यामुळे आपण शारीरिक दृष्ट्या कमकुवत झालो. आपले शिकारी पूर्वज हे आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली होते.

इथुनच आपण निसर्गावर आक्रमण करणं सुरू केलं. उपलब्ध जमीन शेतीयोग्य करण्यासाठी आपण जंगलं तोडली, गवताळ जमिनी नष्ट केल्या, पाण्याचा उपसा सुरू केला. या सगळ्या गोष्टींचे दूरगामी परिणाम झाले. आपण निसर्ग ओरबाडायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर आपण काही प्राण्यांना बळजबरीने पाळायला सुरुवात केली जसं की कुत्रा, डुक्कर आणि पक्षीदेखील जसं की कोंबडा, बदक. हे म्हणजे निसर्गावर सरळ सरळ आक्रमण होतं. आपण नैसर्गिक जैवविविधतेचे सगळे निकष पुढील काही वर्षात मोडले. एका ठिकाणची वनस्पती तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडून इतरत्र वाढवली. उदाहरणार्थ गहू हे तृणधान्य अमेरिकेत कधीच उगवलं नव्हतं पण आज अमेरिकेच्या शेकडो किलोमीटर भूभागावर गव्हाशिवाय तिथले कुठलेच नैसर्गिक गवत उगवत नाही. अशीच कथा इतर अनेक पिकांची आहे. प्रगतीच्या नावाखाली आपण प्राण्यांच्या अनेक प्रजाती कायमच्या नष्ट केल्या. मानवाशिवाय कुठल्याही सजीवाने हे केलेलं नाही आणि मानवाला देखील असं करण्याचा कुठलाही नैसर्गिक आणि नैतिक अधिकार नाही. आज आपल्याला ही गोष्ट समजत असली तरी तेव्हा स्थैर्य, प्रगती याच्या नावाखाली हे शहाणपण सेपिअन्सला सुचलं नाही. शेतीमुळे एकाच ठिकाणी हजारो लोकं रहायला लागले आणि तिथूनच साथीच्या रोगांना सुरुवात झाली. भटक्या अवस्थेत आपण ह्या रोगांपासून मुक्त होतो. त्या काळातील एकही माणूस साथीच्या रोगामुळे मृत्यू पावल्याचा पुरावा आजतागायत मिळालेला नाही. कृषिक्रांतीची मानवाला ही देखील देणगी आहे. हे सगळं अनेक वर्षे झाल्यानंतर आपण परतीचे सगळे दोर कापून टाकले आहेत हे आपल्या लक्षात आलं आहे. इथेच एक महत्वाचा मुद्दा लेखकाने मांडला आहे. आपण शिकारी म्हणूनच राहिलो असतो तर निसर्गाची आजची ही अवस्था झाली नसती असं म्हणायला वाव आहे. त्यामुळे आपण प्रगतीच्या नावाखाली ही गोष्ट गमावली आहे.

जसजशी शेती विकसित होत गेली तसतसे आपण भटके उरलो नाही. एकाच जागी राहणाऱ्या लोकांची संख्या वाढायला लागली आणि आपण व्यवस्था निर्माण केल्या. यातूनच अनेक पुराकथा निर्माण करून सेपिअन्स हे अजून काल्पनिक जगात राहायला लागले. लेखकाच्या मते एखादं राज्य, व्यवस्था ह्या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत त्या नैसर्गिकरित्या अस्तित्वात नसतात. कालौघात आपण गणित, संख्याशास्त्र आणि इतर पद्धती वापरून आपल्या सोयीसाठी अनेक काल्पनिक व्यवस्था निर्माण केल्या आणि ह्या आभासी जगात राहण्याची सवय करून घेतली आणि आज आपण निसर्गापासून जवळपास तुटलेलो आहोत.

निसर्ग, प्राणी, वनसंपदा यानंतर आपण एकमेकांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. शेतीमध्ये आलेल्या स्थैर्यामुळे विविध साम्राज्य निर्माण झाले आणि ते परस्परांच्या जीवावर उठले. धर्माचा उदय आणि विविध साम्राज्य यांनी भरलेला इतिहास हा नंतरच्या भागात मांडला आहे. यात मुख्यत्वे संमिश्र बाबी येतात. म्हणजे साम्राज्य वाढवण्याची महत्वकांक्षा आणि त्यासोबत येणारा रक्तरंजित इतिहास तसेच बुद्धीच्या जोरावर मानवाने केलेल्या अद्भुत रचना. तो विज्ञानाच्या दृष्टीने तितकासा अधोरेखित होत नाही.

शेवटच्या विभागात आधुनिक जगाचा विज्ञानाच्या दृष्टीने एकदम रंजक असा इतिहास वर्णन केला आहे. साधारणतः 500 वर्षांपूर्वी आपल्या इतिहासात विज्ञानाने चंचुप्रवेश केला. त्यापूर्वी देखील विज्ञान हा आपल्या आयुष्याचा भाग होताच पण त्यामध्ये सुसूत्रता नव्हती. मानवी प्रगतीमध्ये विज्ञान तत्पूर्वी केंद्रस्थानी नव्हतं. मानवाने निर्माण केलेल्या पैसा, सत्ता, युद्ध, धर्म ह्यांच्याभोवतीच इतिहास निर्माण होत राहिला. पण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर आधुनिक जगाचा कालखंड सुरू होतो असं मानण्यात येतं. त्यानंतर हळूहळू विज्ञान हे केंद्रस्थानी येत गेलं. आपण अज्ञानी आहोत हे मान्य करायला मानवाने सुरुवात केली आणि नैसर्गिक गोष्टींचं कुतुहुल आणि त्यायोगे निर्माण होणारे प्रश्न यांचा धांडोळा घेण्यास मानवाने सुरुवात केली. याचा वापर खुप चांगल्या प्रकारे युरोपिअन सत्ताधीशांनी करून घेतला. त्यांनी विज्ञान संशोधनाला चालना दिली आणि तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली. जसं की वाफेचे इंजिन, रेल्वेमार्ग, शस्त्रास्त्र निर्मिती, आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा वापर करून युरोपियन देशांनी जगभर वसाहती निर्माण केल्या. अमाप सोनं लुटलं आणि जग पादाक्रांत केलं. वानगीदाखल डार्विन ज्या जहाजावर गेला होता ते जहाज नवीन तेलसाठ्यांच्या संशोधनासाठी गेलं होतं, कॅप्टन कुक हा काही खगोल संशोधकांना घेऊन सुर्यग्रहणाच्या अभ्यासासाठी गेला होता पण त्यांचा मुख्य उद्देश हा साम्राज्यविस्तारच होता पण असले प्रयोग कुठल्याही सत्ताधीशाने इतिहासात केले नव्हते. हळूहळू ह्या लोकांना विज्ञानाच महत्व पटलं आणि त्यानंतर विज्ञान संशोधनाने जी झेप घेतली ती आजतागायत आहे.

इथपर्यंतचा इतिहास हा आपल्याला माहिती असतोच पण यानंतर लेखक जे सांगतो तेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. एक इतिहासकार या भूमिकेशी प्रामाणिक राहून लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच्या मते आज आपण नैसर्गिक निवड या उत्क्रांतीच्या प्रक्रियेपासून मुक्त आहोत किंवा त्याच्या उंबरठ्यावर आहोत. आज आपण आपल्या येणाऱ्या पिढ्या अनुवांशिक जनुकीय आजारांपासून मुक्त करू शकतो. सायबोर्ग हा मानव आणि यंत्रांचा संगम आपण घडवून आणला आहे, इतकंच काय तर आपण आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा टप्पा देखील गाठला आहे. कृत्रिम अवयव निर्मिती, क्लोनिंग ह्या गोष्टी आता सहज शक्य आहेत. हा आपण निसर्गावर मिळवलेला विजय आहे. पण एक इतिहासकार म्हणून लेखक आपल्याला असा प्रश्न विचारतो की आपण कुठे चाललो आहोत आणि आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे हे संपूर्ण मानवजात म्हणून आपल्याला माहिती आहे का?आज आपण एका अशा वळणावर उभे आहोत जिथे एकतर सेपिअन्स नष्ट तरी होतील किंवा ते तंत्रज्ञानाचा स्वर्ग तर निर्माण करतील. इतिहास हा नेहमीच शक्यतेने भरलेला असतो आणि कुठली शक्यता का प्रबळ झाली हे सांगता येणं केवळ अशक्य आहे. एकीकडे हवामान बदल आणि निसर्गाचा ऱ्हास यामुळे पृथ्वी अजून 100 वर्षे तरी टिकेल का ही भिती आहे तर दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता माणसांवर वरचढ ठरून मशिनयुग येईल अशी भिती या क्षेत्रातील तज्ञ वारंवार बोलून दाखवत आहेत. यापैकी काहीही होऊ शकतं किंवा काहीच नाही. पण आपली नेमकी दिशा काय असावी आणि ती सध्या काय आहे या 2 प्रश्नांच्या मध्ये लेखक आपल्याला सोडून देतो आणि जी अस्वस्थता निर्माण होते हेच ह्या पुस्तकाचं यश आहे.

सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

Leave a comment