गोवर पुनरागमन

गेल्या काही महिन्यात जगभरात त्याचप्रमाणे भारतात देखील गोवर ह्या विषाणूजन्य आजार झालेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढली इतकंच नाही काही मृत्यू देखील झाले. मुंबई आणि ह्या महिन्यात राज्यात इतर ठिकाणी सुद्धा गोवरचे रुग्ण चिंताजनक म्हणता येतील इतक्या संख्येने आढळले. कोरोना विषाणूच्या साथीतून जग सावरत असताना, इतर कुठल्याही विषाणूजन्य आजारासाठी आणि त्याच्या साथीसाठी आपण जास्त सतर्क झालो आहोत. हि तशी चांगली बाब आहे. अपरिचित आणि नवख्या कोरोनाने सगळ्या जगाला वेठीला धरलं. गोवर तसा आपल्याला माहीत असलेला विषाणूजन्य आजार! आपण लसीकरणामार्फत ह्या आजारावर नियंत्रण देखील मिळवले आहे पण ह्याचा धोका मात्र सतत असतो आणि तो जरासुद्धा दुर्लक्षित करता येत नाही. कोरोना काळातीळ परिस्थितीमुळे गोवरचं लसीकरण थोडं दुर्लक्षित झालं आणि लगेच ह्या विषाणूने आपल्या क्षमतेची चुणूक दाखवली आहे. आपल्याला ज्ञात असणाऱ्या विषाणूजन्य आजारांपैकी हा विषाणू तसा अलीकडच्या काळातील आहे. इतर कुठल्याही विषाणूसारखे गोवरने देखील आपले हातपाय पृथ्वीवर चांगलेच पसरले होते आणि हजारो जीव घेऊन आपली क्षमता देखील सिद्ध केली आहे. १९७० च्या दशकात गोवरची लस उपलब्ध होईपर्यंत हा आजार लहान मुलांमध्ये असणाऱ्या मृत्यूच्या महत्वाच्या कारणांपैकी एक होता. गोवरच्या विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड संसर्गक्षमता. लक्षणं दिसण्यापूर्वीच ह्याचा रुग्ण आसपासच्या अनेक लोकांसोबत ह्या विषाणूची देवाणघेवाण करू शकतो. अशा ह्या गोवरची साथ परत आली आहे. ह्याला साथ ह्यासाठी म्हणायचं की २०१९,२० आणि २१ ह्या वर्षात २०० पेक्षा जास्त रुग्णसंख्या नसताना ह्यावर्षी डिसेंबरच्या मध्यापर्यंत ५५३ इतकी संख्या महाराष्ट्रात नोंदली गेली आहे. मृत्यूदेखील अर्थात जास्तच आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, ह्या विषाणूचा इतिहास काय आहे? तो इतका घातक कशामुळे आहे? त्यावर ताडीने उपचार करणे का गरजेचे होऊन बसते? ह्या आणि अशा इतर अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणं आवश्यक आहे.

गोवरच्या विषाणूचा ज्ञात इतिहास पाहायला गेलं तर असं लक्षात येईल की हा विषाणू, देवीच्या विषाणू इतका फार प्राचीन वगैरे म्हणावा इतका जुना निश्चित नाही. देवीचा विषाणू किंवा देवीचा रोग हा फार पूर्वीपासून माहिती आहे कारण काही ईजिप्शियन ममी सापडल्या आहेत ज्यांना देवी झाला होता. त्यामानाने गोवर ह्या रोगाविषयी माहीती शोधात गेलो असता ह्या रोगाविषयी पहिली लिखित माहिती इसवी सन ९१० मध्ये आढळून येते. त्यावेळी अबू बक्र मोहम्मद झकारिया राझी असं लांबलचक नाव असणाऱ्या एका पर्शियन डॉक्टरने ह्या रोगाविषयी लिहून ठेवलं आहे. त्यात तो असो म्हणतो कि देवी आणि गोवर हे पूर्णपणे भिन्न आणि स्वतंत्र असे रोग आहेत. त्यामुळे ह्यापूर्वी देखील हा रोगाचे रुग्ण असतील पण त्यांना देवीचे रोगी समजण्यात येत असावं अशी एक अंधुकशी शंका आहे. त्यानंतर ह्या रोगाचा उल्लेख थेट १७ व्या शतकात आढळतो. अमेरिकेतील बोस्टन येथे गोवरचे रुग्ण आढळल्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे मानवी इतिहासात हाहाकार उडवणाऱ्या देवी, फ्लू, प्लेग अशा रोगांच्या रांगेत गोवरला स्थान किमान इतिहासात तरी दिसत नाही असं म्हणायला वाव आहे.

गोवरचं महत्व

असं असलं तरी ह्या रोगाला कमी लेखण्याची चूक महागात पडू शकते. ह्याच मुख्य कारण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे वेगाने पसरण्याची ह्या विषाणूची क्षमता अफाट म्हणावी अशीच आहे. ती किती असावी? विषाणूंच्या बाबतीत एक संकल्पना वापरली जाते ती म्हणजे R value. थोडक्यात सांगायचं तर एखादी व्यक्ती जिला त्या विशिष्ट विषाणूचा संसर्ग झाला असेल तर ती किती व्यक्तींना त्या विषाणूने संक्रमित करू शकते हे मोजण्याचं एकक. गोवरची ही R value आहे १२-१८. ह्याचा अर्थ असा आहे कि गोवरचा रुग्ण त्याच्या आजूबाजूच्या १२-१८ लोकांना संक्रमित करू शकतो. कोरोना विषाणूची R value हि जास्तीत जास्त ७ इतकी आढळली आहे. ह्यावरून गोवरच्या क्षमतेची कल्पना येऊ शकते. लस येण्यापूर्वी साधारणपणे दर २-३ वर्षाला गोवरची साथ येत असे.

आणखी चिंतेची बाब म्हणजे हा विषाणूचं संक्रमण मुख्यत्वे वय वर्षे ५ च्या आतील लहान मुलांना होते आणि जास्तीत जास्त ३०% इतक्या केसेस गंभीर रूप धारण करू शकतात आणि मृत्यू देखील येऊ शकतो. अमेरिकेतील ह्या रोगाच्या नोंदी महत्वाची माहिती पुरवतात. लस येण्यापूर्वी जवळपास प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी ह्या विषाणूचं संक्रमण होऊन जाई. वयाच्या ६ वर्षांपर्यंत ५०% इतक्या लोकसंख्येला तर १५ वर्षांपर्यंत ९०% इतक्या लोकसंख्येला ह्या विषाणूची ओळख होऊन जात असे. दरवर्षी ३०-४० लाख इतक्या लोकांना हा विषाणू रोग उत्पन्न करत असे तर जवळपास ५०० मृत्यू होत असत. इतकं असलं तरी १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत फक्त इतकंच समजू शकलं होत कि रुग्णाच्या रक्तात असणाऱ्या घटकामुळे हा रोग पसरतो. त्यानंतर तब्बल २०० वर्षांनंतर, १९५४ मध्ये बोस्टन मध्येच Enders आणि Peebles ह्या जोडगोळीला गोवरचा विषाणू शोधण्यात यश आलं. ह्या रोगाची विशिष्ट अशी लक्षणं आहेत. गोवरची विशिष्ट अशी पुरळ डोक्यापासून सुरु होते आणि तोंडात आतल्या बाजूला दिसायला लागते. त्यानंतर शरीराच्या खालच्या भागात पसरू लागते. म्हणजे छाती, हात, पाय अशा क्रमाने. आश्चर्य म्हणजे तळहात आणि तळपाय इथे पुरळ येत नाही. ज्या क्रमाने येते त्याच क्रमाने नाहीशी सुद्धा होते. गंभीर बाब म्हणजे पुरळ येण्याच्या आधीपासूनच व्यक्तीकडून हा विषाणू पसरायला सुरुवात होते. साधारणपणे एकदा संक्रमण झालेल्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी रोगप्रतिकारक क्षमता प्राप्त होते. गोवरवर आजच्या घडीला विशिष्ट असे उपचार उपलब्ध नाहीत. लसीकरण हाच त्यापासून वाचण्याचा सोपा, थेट आणि सर्वोत्कृष्ट उपाय आहे.

१९६३ मध्ये गोवरची लस आली आणि तेव्हापासूनच हा रोग आटोक्यात आला. त्यानंतर काही वर्षांनी असं लक्षात आलं कि लसीकरण होऊनसुद्धा हा रोग परत काही मुलांना झाला आणि लशीचा एक डोस पुरेसा नाही असा निष्कर्ष आला आणि म्हणूनच बुस्टर डोस द्यायला सुरुवात झाली. भारतात मात्र गोवरची लस द्यायला सुरुवात होण्यासाठी १९८५ साल उजाडावं लागलं. तेसुद्धा वर्षाच्या शेवटी. दुसरा डोस २०१० पासून भारतात दिला जातो. तेव्हापासून भारतात गोवर आटोक्यात म्हणावा असाच आहे. वयाची ९ महिने पूर्ण झाल्यावर पहिला डोस दिला जातो. Measles, Mumps आणि Rubella अशा तीन विषाणूंची एकत्रित लस भारतात दिली जाते.

पुनरागमनाची कारणं काय?

भारतातच नव्हे तर जगभरात गोवरचे रुग्ण वाढायला लागले. १५ डिसेम्बर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने खुलासा केला कि ह्या मागची काय कारण आहेत? त्याच मुख्य कारण म्हणजे कोरोनाच्या जागतिक साथीत गोवरच्या लसीकरणावर आलेल्या मर्यादा. फक्त गोवरच नव्हे तर इतरही अनेक लसीकरणावर परिणाम झाला आणि त्याच प्रमाण घटलं. त्यामुळे ह्या विषाणूने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. ह्यावरचा उपाय म्हणजे लसीकरणाचा वेग वाढवणे. जे सध्या जोरदार सुरु आहे. भारतात देखील ह्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हि रुग्णसंख्या कमी होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. पण ह्यानिमित्ताने ह्या विषाणूजन्य रोगांकडे दुर्लक्ष करता येणार नाही हि बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. लसीकरण हाच रामबाण उपाय येणाऱ्या काळात देखील महत्वाचा असणार आहे. कारण आपले शत्रू हे हार मानणाऱ्यांपैकी नाहीत ते फक्त संधीची वाट पाहत असतात आणि आपले हातपाय पसरण्याची कुठलीही संधी ते सोडत नाहीत. आपण मात्र सदैव जागरूक असलं पाहिजे तरच हे पुनरागमन परतून लावता येईल.

फोटो सौजन्य: गुगल
माहितीस्रोत:

https://www.latestly.com/socially/world/is-measles-making-a-comebackwhy-are-we-seeing-a-resurgence-of-the-diseaseswhat-can-latest-tweet-by-world-health-organization-4590618.html

https://www.atrainceu.com/content/2-history-and-pathology-measles

https://www.news-medical.net/health/Measles-History.aspx

chrome-extension://efaidnbmnnnibpcajpcglclefindmkaj/https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4078488/pdf/IJMR-139-491.pdf

Leave a comment