देवीचा कोप

प्लेगनंतरचा मोठा रोग म्हणजे देवी. तस बघायला गेलं तर हा  रोगही तसा धोकादायकच होता परंतु प्लेगच्या मानाने ह्या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होत . त्याच कारण पूढे येईलच.

13 डिसेंबर ह्या वरवर साधारण वाटणाऱ्या दिवसाचं विशेष महत्व आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मागच्या वर्षी  ह्या दिवशी एका विशेष सभेचं आयोजन केलं होतं. निमित्त होतं देवी ह्या विषाणूजन्य रोगाचं निर्मूलन होऊन 40 वर्षे झाली ह्या घटनेचं! मानवी इतिहासात ह्या विषाणूने केलेली नासधूस  इतकी  भयंकर आहे की ह्या विषाणूचं निर्मूलन ही  मानवी इतिहासातील एक आनंदाची घटना आहे. ज्ञात इतिहासातील सर्वात जुना संसर्गजन्य रोग म्हणून देवीच्या रोगाची नोंद आहे. इजिप्त मध्ये सापडलेल्या काही ममी ह्या रोगांमुळे मरण पावल्याचे पुरावे मिळाले आहेत. देवीची साथ आलेली असताना शहरंच्या शहरं उद्धवस्त झालेली आहेत. अशा ह्या रोगाचं 1980 मध्ये पूर्णपणे निर्मूलन झालं आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं.

पण असं असलं तरी हा दिवस बघण्यासाठी मानवी आयुष्याची तब्बल 180 वर्षे खर्ची पडली आहेत. ह्या रोगापासून सुटका व्हावी म्हणून मानवाने केलेल्या प्रयत्नांची ही कथा..

युरोपियन लोक वसाहती करण्यासाठी जगभर फिरायला लागले तेव्हा त्यांनी आपलयासोबत देवी आणि इतर रोगांना देखील नेलं. स्पॅनिश लोक अमेरिका खंडात पोचले तेव्हा हा रोग तिथे नव्हता. पण थोड्याच कालावधीत तिथे युद्ध आणि सोबतच विविध रोगांच्या साठी पसरायला सुरुवात झाली. या सर्व गोष्टींमुळे  ९०% स्थानिक अमेरिकन लोकसंख्या नष्ट झाली. यात देवीच्या रोगाचा मोठा वाटा होता. अशाप्रकारे देवीचा  रोग इतिहासात महत्वाचा आहे. युरोपसारखंच हा रोग पृथ्वीवर सर्वत्र पसरला होता. पण आफ्रिका, चीन आणि भारत इथे या रोगामुळं  होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होत. ह्याच कारण म्हणजे इथे ह्या रोगाची लस उपलब्ध होती. ह्या रोगातून जे लोक वाचतात त्यांना हा रोग परत होत नाही असं निरीक्षण होत. हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि एकदा रोग झाला कि रोग्याच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते हि संकल्पना या देशातील लोकांना माहित नव्हती. तरीदेखील देवी झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून काही कण काढून ते निरोगी व्यक्तींच्या शरीरात लहानपणीच टोचवले जात. त्यामुळे बऱ्याच लोकांना अशी लस लहानपणीच मिळायची.

मानवी आयुष्याला असलेला ह्या विषाणूजन्य रोगाचा धोका आपण पूर्वीच ओळखला होता. तो टाळण्यासाठी लसीकरणाचा उपाय हा आश्चर्यकारकरित्या जगाच्या विविध भागात केल्या जायचा. म्हणजे प्रकार वेगवेगळे असले तरी देवीच्या रोगापासून सुटका करण्यासाठी हा रोग एकदा नमुन्यासाठी आपल्या शरीरात गेला पाहिजे इतकं ज्ञान आपल्याला नक्की होतं पण हे करण्यासाठी सुसूत्रता मात्र कुठेच नव्हती. कित्येक वर्षे अशीच जात राहिली. नेमकं जर सांगायचं झालं तर देवीच्या लसीकरणाचा सर्वात जुना लिखित पुरावा हा इसवी सन 1549 मधला आहे.

त्यानुसार ह्या काळात आफ्रिका आणि चीन ह्या देशांमध्ये देवीच्या लसीकरणाची एक भयंकर पद्धत अस्तित्वात होती. ह्या पद्धतीत देवीचा रोग झालेल्या व्यक्तीच्या फोडांमधून येणारा द्रव काढून त्याची भुकटी केली जायची आणि ही भुकटी निरोगी व्यक्तीच्या नाकात फुंकली जायची. ही भुकटी कधी, किती फुंकायची ह्याचं कुठलंही गणित नव्हतं. सर्व वयोगटातील लोकांना अंदाज घेऊन ह्या फवारणीला सामोरं जावं लागायचं. त्यामुळे ह्या प्रकारात देखील मृत्यूचं प्रमाण 2-3% होतं. पण त्याकाळात जर साथ आली तर हेच प्रमाण 30% पर्यंत जात असे त्यामुळे हा 2-3% मृत्युदर परवडला अशी परिस्थिती होती.

इंग्लंडमध्ये असणाऱ्या प्रसिध्द अशा रॉयल सोसायटीच्या कागदपत्रात इसवी सन 1700, 1714, 1716 आणि 1742 या वर्षांमध्ये लसीकरणाच्या प्रयोगाच्या नोंदी आहेत. ह्या नोंदी चीन, आफ्रिका आणि तुर्की ह्या देशात गेलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. इसवी सन 1714 आणि 1716 मध्ये ह्या शाही अधिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून काम पाहणाऱ्या टिमोनि नावाच्या व्यक्तीने तुर्की मध्ये असणारी ही पद्धत नोंदवली. ह्यामार्फत मोन्टेग्यू नावाच्या एका अधिकाऱ्याच्या मुलाचं लसीकरण त्याने केलं.

त्या मुलाच्या आईने मग हीच पद्धत राजघराण्यातील लोकांना देखील वापरता येईल असं सुचवल्यामुळे तसा प्रयोग ह्या शाही कुटुंबातल्या व्यक्तींवर  सर्वप्रथम केल्याच्या नोंदी आढळतात. पण हे प्रयोग खूप मर्यादित होते. सर्वदूर ह्यांचा प्रसार झाला नव्हता. जगात ठिकठिकाणी देवीची साथ सतत सुरू असायची आणि त्यात हजारो लोकं बळी पडायचे. जगभरात स्वीकारली गेलेली लस शोधण्याचं श्रेय जात ते एडवर्ड जेन्नर ह्या शास्त्रज्ञाकडे.

देवीची लस आणि इंग्लंड हे एक समीकरण होतं. ह्या लसीचा आणि इंग्लंडचा कुठून तरी संबंध लागायचा. एडवर्ड जेन्नर हा शास्त्रज्ञ इंग्लंडचा, बर्कले इथला! तो एक डॉक्टर होता आणि ह्या रोगाविषयी त्याला विशेष कुतूहल होतं. ही लस बनवण्याचे त्याचे प्रयत्न चालूच होते पण त्याला म्हणावी तशी दिशा मिळत नव्हती. एका घटनेमुळे त्याला ती दिशा मिळाली. इंग्लंडमध्ये देवीची साथ पसरली असताना एकदा त्या गावातील काही मुली ह्या जेन्नर कडे आल्या होत्या. त्याच्या घरी दुधाचा व्यवसाय होता. त्या मुलींनी त्याला असं सांगितलं की त्यांना देवीच्या रोगाची मुळीच भीती नाही कारण त्यांना देवीसारखा रोग होऊन गेला आहे. त्या खूपच आत्मविश्वासाने बोलत होत्या. तेव्हा हा नेमका काय प्रकार आहे ह्याचा छडा लावायचा जेन्नरने ठरवले. त्याला आढळले की एक देवीसदृश गाईंमध्ये होतो पण ह्यात पुरळ ही फक्त स्तनांवर येते. दूध काढत असताना त्याचा संसर्ग ह्या मुलींना देखील होतो आणि त्यामुळे ह्या मुली देवीच्या विषाणूला बळी पडत नाहीत. पण ह्याचा संबंध काय? आज आपल्याला माहिती आहे की हे दोन्ही विषाणू एकाच कुटुंबातील आहेत. जेन्नर ने एक प्रयोग करायचे निश्चित केले. सारा नावाच्या मुलीला ह्या रोगाची लागण झाली होती तिच्या हाताला आलेल्या पुरळीतून जेन्नर ने द्रव काढण्यात यश मिळवले आणि हा द्रव किंवा विषाणू जेम्स नावाच्या त्याच्या माळ्याच्या 8 वर्षाच्या मुलाला टोचले. हा अगदी साधा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला. हा मुलगा थोडा आजारी पडला आणि नंतर ठणठणीत बरा झाला.त्यानंतर जेन्नर ने ह्यावर अजून संशोधन केले आणि 1796 मध्ये डॉ क्लिंच ह्याच्या मदतीने लस बनवली. ही लस प्रचंड यशस्वी झाली. त्यानंतर जगभर ही लस वापरण्यात आली आणि हळूहळू ह्या रोगाचे पूर्णपणे निर्मूलन करण्यात आपल्याला यश आले.