Monthly Archives: April 2018

आपण सारे उत्क्रांतिवीर!

डार्विन आणि त्याचा उत्क्रांतिवाद ही जोडी विलक्षण आहे. कारण जेव्हापासून त्याने हा सिद्धांत मांडला तेव्हापासून ते आजतागायत सतत वाद सुरूच आहे. 19 एप्रिलला डार्विनला जाऊन 136 वर्षे झाली पण अजून काही हा वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. तसं पाहता डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा सिद्धांत हा वैज्ञानिक जगतात स्वीकारला गेला आहे. नाही म्हणायला अजूनही काही नवे सिद्धांत येत असतात पण ते सिद्ध नाही होऊ शकत. त्यामुळे इसवी सन 1859 ते आजपर्यंत डार्विनच्या सिद्धांताला पर्याय नाही अशीच स्थिती आहे. हा सिद्धांत काय आहे हे पुढे येईलच पण त्यापूर्वी काय होतं हे जाणून घेणं खूपच रोचक आहे.

आपण कुठून आलो? हा प्रश्न आपल्यासाठी नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. तसं बघायला गेलं तर धर्मग्रंथांमध्ये ह्याच उत्तर दिलं आहे पण विज्ञानाच्या कसोट्यावर ते उत्तीर्ण होत नाही. आपल्याबरोबरच जीवसृष्टीतील इतर घटक कसे निर्माण झाले हेदेखील एक कोडंच होतं. त्यामुळे युरोपात डार्विनच्या आधी विविध सिद्धांत निर्माण झाले पण त्यापैकी एकही सर्वमान्य सिद्धांत होऊ शकला नाही. त्यातल्या त्यात कमी त्रुटी असलेला एक सिद्धांत होता. डार्विनचा सिद्धांत येण्याच्या बरोबर 50 वर्षे आधी तो मांडण्यात आला, Lamarck या जीवशास्त्रज्ञाने तो मांडला. Transmutation of species हा तो सिद्धांत. त्याला आपण जीवांचे परिवर्तन असे म्हणूया(हा शब्द कदाचित चुकीचा देखील असू शकतो). आज आपण हे मानतो सर्व प्राण्यांची उत्पत्ती ही एका सामायिक जीवपासून झाली आहे पण ह्या सिद्धांताला हे मान्य नाही. त्यानुसार उपलब्ध परिस्थितीत जिवंत राहण्यासाठी प्रत्येक सजिवात बदल होतात आणि नवे जीव तयार होतात. म्हणजे एक जीवापासून संपूर्णपणे नवा जीव तयार होतो. कधी कधी हे जीव क्लीष्ट बनतात. हे त्यावेळेस तरी मान्य करण्यात आलं होतं पण पूर्णपणे नाही.

डार्विनच म्हणणं वेगळं होतं आणि त्याच्या म्हणण्याला आधार होता. हा आधार म्हणजे त्याने केलेल्या असंख्य जीवांच्या नोंदी. त्यातून हा सिद्धांत पुढे आला होता. ह्या नोंदी डार्विनने त्याच्या एका विख्यात प्रवासात केल्या होत्या. तो म्हणजे HMS Beagle या जहाजावरचा जगप्रवास. डार्विन ह्या प्रवासाला कसा गेला ह्याची कथा मोठी गमतीशीर आहे. ह्या जहाजाची कथा देखील तशीच आहे. डार्विन गेला तो ह्या जहाजाचा दुसरा प्रवास. तेलसाठे शोधण्यासाठी इंग्लंडच्या सैन्याने याआधी ह्याच जहाजाला दक्षिण अमेरिकेत पाठवले पण त्याच्या आधीच्या कप्तानाने आत्महत्या केली आणि ही मोहीम काही यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे दुसऱ्या वेळेस एका नव्या दमाच्या फक्त 26 वर्ष वय असलेल्या एका कप्तानवर ही जिम्मेदारी देण्यात आली. त्याची अशी इच्छा होती की आपल्यासोबत एक भूगर्भशास्त्रज्ञ असावा. म्हणजे काही अडचण आली किंवा सल्ल्याची गरज पडली तर बरं होईल (आणि हो जो त्याच्यासोबत जेवण देखील करेल हीदेखील एक अटवजा इच्छा होती). प्रवास हा फक्त 2 वर्षांचा होता पण तो 5 वर्ष चालला. मग काय कॅम्ब्रिज विद्यापीठातील दोघा तिघांना विचारून झालं पण कोणाचाच मेळ बसत नव्हता. शेवटी डार्विनचा पर्याय समोर आला आणि त्याची वर्णी लागली त्यावेळी तो फक्त 22 वर्षाचा होता. हे जहाज जरी दक्षिण अमेरिकेत जाणार होत तरी ते जगभर फिरलं आणि ह्या निवांत प्रवासात डार्विनने जिथे जाईल तिथे प्राण्यांच्या नोंदी करून ठेवल्या. असंख्य प्रकारचे प्राणी पाहिले. हळूहळू त्याला काही गोष्टी जाणवत होत्या आणि एक सिद्धांत आकार घेत होता. झालेल्या एकूण 5 वर्षांपैकी 18 महिने म्हणजे दीड वर्ष प्रवासात गेलं. बाकी साडे तीन वर्ष HMS Beagle तेलसाठे शोधणे आणि नकाशे तयार करणे हेच काम करत होत. डार्विनला यासोबत कीटक, पक्षी, जलचर, सरपटणारे प्राणी असे विविध प्रकार पाहायला मिळाले. वनस्पती देखील होत्या. त्याला याची आवड निर्माण झाली. तिथून आल्यावर डार्विनने एक पुस्तक लिहिलं ते म्हणजे on the origin of species. ह्या पुस्तकाने धमाल केली. या पुस्तकातच जगप्रसिद्ध उत्क्रांतिवाद मांडण्यात आला. त्यानुसार आपल्या सर्वांची उत्पत्ती एका सामायिक जिवापासून झाली आहे असं म्हणलं होत. हे त्या Lamarck च्या सिद्धांतापेक्षा भिन्न होतं. अजूनही काही प्रस्थापित विचारांना धक्के देणारे विचार होते. मूळ मुद्दा असा होता की, प्रत्येक सजीवात नैसर्गिकरित्या सतत बदल होत असतात. त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती देखील बदलत असते. त्यावेळी निसर्ग अशाच जीवांना निवडतो जे त्या परिस्थितीत समर्थपणे जगू शकतात. जगण्यासाठी आवश्यक असणारे बदल हे पुढच्या पिढीत संक्रमित होतात. त्यामुळे बलवान सजीवच इथे जगू शकतात असा निष्कर्ष निघत होता. ही बाब म्हणजे Survival Of the Fittest आणि Natural Selection. म्हणजे Lamarck म्हणतो तसा पूर्णपणे नवीन जीव तयार होत नाही. जे आहेत त्यांच्यातच थोडे बदल होतात. पण यासोबत डार्विनने अजूनही काही गोष्टी सांगितल्या त्यातली एक महत्वाची गोष्ट जी नेहमी चुकीच्या पद्धतीने समजून घेतली जाते ती म्हणजे माणूस आणि माकड यांचा संबंध. डार्विनने सांगितले की माणूस आणि माकड यांचा पूर्वज एकच जो आता अस्तित्वात नाही. याचा अर्थ असा होता की माणूस आणि माकड हे एकाच सामायिक जिवापासून उत्क्रांत झाले. ना की माणूस माकडापासून. झालं..ही गोष्ट तर लोक मान्य करायला तयारच नव्हते. मग डार्विनने अनेक सामायिक बाबी निदर्शनास आणून दिल्या. तरी धर्मसत्तेने याला मान्यता दिली नाही. परंतु सुदैवाने त्याला गॅलिलियो सारख्या यातना वगैरे वाटयाला आल्या नाहीत. आजही लोक असंच मानतात की डार्विनच्या म्हणण्यानुसार माणूस हा माकडापासून उत्क्रांत झाला मग अजूनही माकडे कशी काय आहेत त्यांचा माणूस का नाही झाला? हे समजून घेण गरजेचं आहे. एक सामायिक पूर्वज जो माकडसदृश आहे. ह्या सजीवापैकी काही सजीव हे दोन पायावर चालू शकत होते (नैसर्गिक भिन्नता). कालांतराने निसर्गात असे बदल झाले की ही परिस्थिती या 2 पायांवर चालणाऱ्या लोकांसाठी अनुकूल झाली. त्यामुळे त्या परिस्थितीत हे प्राणी fittest होते. त्यामुळे ते तगले. जे नव्हते ते एक तर नामशेष झाले किंवा त्यांना अनुकूल असलेल्या ठिकाणी स्थलांतरित झाले. लाखो वर्ष परिस्थिती बदलत राहिली आणि यातला प्रत्येक सजीव स्वतःमध्ये बदल घडवत परिस्थितीशी अनुकूल होण्याचा प्रयत्न करत राहिला. हे बदल होत होत आजचा माणूस तयार झाला आणि एका बाजूला माकड, गोरिला, ओरांगुटान आणि चिंपाजी हे एकमेकांशी कमालीचे साम्य असणारे जीव उत्क्रांत होत गेले. ह्या जीवांमध्ये असणारे बदल हे खरं म्हणजे ते सगळेे वेगळ्या परिस्थितीत होते हेच सांगतात. आज सुद्धा आपण पाहतो की जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात मानवी सांगाडे सापडतात. ते लाखो वर्षे जुने असतात. त्यांचे प्रकार देखील वेगळे असतात. कारण त्याकाळात पृथ्वीवर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी वेगळी होती (तशी ती आजही आहे). म्हणून निअनडरथल, क्रोमॅगनॉन, होमो सॅपीअन्स, होमो सॅपीअन्स सॅपीअन्स असे विविध प्रकार अस्तित्वात आले, एकमेकांपासून उत्क्रांत झाले आणि नामशेष देखील झाले. आपल्या ह्या सर्वांचा एक पूर्वज सध्या मादागास्कर बेटावर शिल्लक आहे Primates या नावाचा. त्याच्या आधीचा पूर्वज आता शिल्लक नाही. ह्या सर्व गोष्टी घडल्या त्याला लाखो वर्षे लागली हे बदल खूपच मंद गतीने घडले आणि अजूनही घडत आहेत. त्यामुळे आज आपण गोरिला वगैरे माकडंसोबत 99% पेक्षा जास्त जनुकीय साधर्म्य दाखवतो. याचाच अर्थ डार्विन बरोबर आहे. जर परिस्थिती झपाट्याने बदली तर सजीव देखील वेगाने उत्क्रांत होतात. जस की क्रोमॅगनॉन मानवापासून आपली उत्क्रांती ही फक्त 10000 वर्षात झाली असं मानण्यात येतं पण निअनडरथल पासून क्रोमॅगनॉन उत्क्रांत होण्यासाठी लाखो वर्षे लागली. आपल्याप्रमाणेच एकमेकांसोबत साधर्म्य असलेले अनेक प्राणी, वनस्पती आपल्याला आजूबाजूला दिसतील. त्यांची कथा अशीच आहे. मग असा प्रश्न पडेल की आता यापुढं काय?आपलं काय होणार?आपली उत्क्रांती थांबली आहे का?तर तस नाही. उत्क्रांती ही अखंड अशी प्रक्रिया आहे. फरक इतकाच आहे की मानवाने बुद्धीच्या बळावर स्वतःला इतके सक्षम केले आहे की परिस्थिती बदलली तरी आपण तग धरू शकतो. आणि इतरांना वाचवू शकतो. पण आपल्यात देखील काही बदल निश्चित होतील जस की अपेनडिक्स हा अवयव जो निरुपयोगी आहे तो काही हजार वर्षानंतर आपल्या शरीरात नसेल. आपला मेंदू जास्त मोठा झाला असेल. Y जनुक हे आखूड होत चाललंय. आपल्या शरीरावरील केस हे देखील कालांतराने नसतील. असे काही बदल अपेक्षित आहेत.

सगळ्यात जास्त बदल होतात ते सुक्ष्मजीवांमध्ये. कारण एक तर ते एकपेशीय. त्यातून एका पेशीच आयुष्य काही मिनिटांच त्यामुळे त्यांच्या आजूबाजूची परिस्थितीला ते विलक्षण वेगाने सामोरे जातात आणि बदल देखील तितक्याच वेगाने घडतात. सध्या होणारे हवामान बदल आणि वाढणार तापमान हे अनेक प्रजातींच्या नामशेष होण्याला कारणीभूत आहे. ह्या वेगाने बदलणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांमुळे उत्क्रांती प्रक्रियेवर प्रचंड घातक परिणाम होत आहेत यामुळे अनेक नवे आणि विचित्र जीव निर्माण होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक नवे आजार निर्माण होतील ज्यांना सामोरं जाणं आपल्याला अवघड आहे अशी शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करतात.

हे सगळं समजून घेतल्या नंतर याच महत्व आपल्या लक्षात आलं असेलच. त्यामुळे स्वतःला उत्क्रांतिवीर हे बिरुद आपण बिनधास्त लावू शकतो. माकडांची भीती बाळगण्याच काही कारण नाही.