Monthly Archives: January 2019

मानवी शरीराची Fantastic Voyage!

अल्बर्ट आइनस्टाइन एकदा म्हणाले होते की ज्ञानापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे कल्पनाशक्ती कारण ज्ञानाला मर्यादा येऊ शकतात पण कल्पनाशक्ती ही विश्वाला कवेत घेऊ शकते. विज्ञान समजून घेण्यासाठी देखील कल्पनाशक्तीच उपयोगाला येते. विज्ञानातील अनेक संकल्पना ह्या कल्पनतेच होत्या ज्या नंतर अस्तित्वात आल्या. चित्रपट म्हणजे तर कल्पनेचीच दुनिया. त्यामुळे चित्रपट जर विज्ञानावर आधारित असेल तर ती मेजवानीच! काही उत्कृष्ट विज्ञान चित्रपट हे जरूर बघावेत असेच आहेत. दुर्दैवाने बरेचसे चित्रपट हे परग्रहावरील जीव आणि मानवाचा संघर्ष, यंत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा अमानवीय क्षमता असलेले पात्र यावरच आधारित आहेत. पण विज्ञान हे काही इतकंच मर्यादित नाही. विज्ञानातील कित्येक संकल्पना ह्या अजूनपर्यंत चित्रपटात वापरल्याच गेल्या नाहीत. असं सगळं असताना एक चित्रपट ह्या सगळ्या परिस्थितीला अपवाद आहे. विशेष म्हणजे चित्रपट तंत्रज्ञान बाल्यावस्थेत असतानाच्या काळात ह्या चित्रपटाने काही गोष्टी अगदी अफलातून दाखवल्या आहेत. नेहमीचे विषय न हाताळता अगदी नवीन विषय घेऊन हा चित्रपट 1966 मध्ये आला होता. मानवी शरीराच्या आत काय काय घडू शकतं हे खूपच रंजक पद्धतीने यात दाखवलेले आहे. हा चित्रपट खरं म्हणजे मानवी शरीराचा आतून केलेला प्रवासच आहे त्यामुळे ह्याच नाव देखील साजेसच आहे, Fantastic Voyage!

ह्या कथेला अमेरिका आणि रशिया शितयुद्धाची पार्श्वभूमी आहे. ह्या काळाने अनेक युद्धकथा, रहस्यकथा इत्यादी प्रकारांना खाद्य पुरवलं. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात ह्या दोन देशांनी जगाला कळत नकळत अनेक चांगल्या गोष्टी दिल्या. अमेरिकेने चंद्रावर ठेवलेलं पाऊल हे देखील शीतयुद्धाचाच एक भाग होतं. ही स्पर्धा चालू असताना दोन्ही देशांनी विज्ञान संशोधनावर अमाप खर्च केला. नवनवे तंत्रज्ञान विकसित केले. अवकाश संशोधन ते नवनवे शस्त्र अशा सगळ्या क्षेत्रात खूपशी भर टाकली आणि खऱ्या अर्थाने आधुनिक जगाची निर्मिती केली. याच काळात काही वैज्ञानिक संकल्पनांवर खुप संशोधन झालं जस की मानवाला अदृश्य करता येईल का किंवा सूक्ष्मरूपात परावर्तित करता येईल का? या गोष्टींचा बराचसा पाठपुरावा करण्यात आला. जैविक युद्ध देखील करण्याचे प्रयत्न झाले होते.

यापैकीच एक कल्पना मध्यवर्ती ठेऊन या चित्रपटाची कथा लिहिली गेली, ती म्हणजे मानवाचे सूक्ष्मरुपात रूपांतर करणे. ह्या सूक्ष्मरूपाच मानवाला खुप आधीपासून आकर्षण आहे. अगदी पुराणात देखील याचे दाखले आहेत. इतकच काय गलिव्हरच्या गोष्टिंमध्ये तर तो चक्क अशा एका देशात जातो जिथे फक्त नखाईतक्याच उंचीचे लोक असतात. त्यानंतरच्या काळात ही कल्पना फारशी कुठे दिसत नाही पण मानवाला अस सूक्ष्मरूप देता येईल का याची वैज्ञानिक पडताळणी सुरु होती अर्थात याला फारसा आधार नव्हता आणि आजदेखील नाही. पण विज्ञान हे नेहमीच शक्यतानी भरलेलं असतं. आज अस्तित्वात असणाऱ्या कित्येक गोष्टी ह्या काही काळापूर्वी कल्पनेतच होत्या. त्यामूळे भविष्यात ही कल्पना देखील प्रत्यक्षात येऊ शकते.

1966 मध्ये ही गोष्ट मानवाला शक्य झाली आहे असं गृहीत धरून ही कथा रचण्यात आली. चित्रपटाची थोडक्यात कथा अशी आहे की अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी मानवाला सुक्ष्मरूपात परावर्तित करणार तंत्रज्ञान विकसित केलं आहे पण हे सुक्ष्मरुप फक्त 1 तासच राहू शकत इतपतच शक्य होतंय. ते कायमस्वरूपी राहावं यासाठी दोन्ही देशाचे शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करत आहेत. रशियाच्या शास्त्रज्ञाच्या गटात असणारे डॉ बेन्स यांना ते शक्य होतं पण ते अमेरिकेला पळून जातात. साहजिकच रशियाला ही गोष्ट जिव्हारी लागते आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होतो सुदैवाने ते त्यातून वाचतात. पण ह्या हल्ल्यात त्यांच्या मेंदूला मार लागतो आणि मेंदूमध्ये रक्ताची एक गाठ तयार होते त्यामुळे ते कोमात जातात. अमेरिकी शास्त्रज्ञांसाठी बेन्स जिवंत राहणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून ते एक धाडस करायचं ठरवतात. त्यांच्या मेंदूतील रक्ताची गाठ प्रत्यक्ष मेंदूत जाऊन नष्ट करायची असं ठरतं आणि एक टीम निवडली जाते. ही टीम एका पाणबुडीतून सुक्ष्मरूपात त्यांच्या मेंदूत जाईल आणि लेसर किरणांची गन वापरून ती गाठ नष्ट करेल असा प्लॅन असतो. या कामासाठी त्यांच्याकडे फक्त एक तास वेळ असतो. संपूर्ण पाणबुडीला एका बॅक्टेरिया इतकं सुक्ष्मरुप देण्यात येत आणि इंजेक्शन मार्गे त्यांना त्यांच्या शरीरात सोडलं जातं. ह्या पाणबुडीचा तिथून सुरू होतो मानवी शरीराच्या आतमधून प्रवास. हा प्रवास म्हणजेच fantastic voyage!

हा प्रवास खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इतर कुठल्याही मिशनसारखं यात देखील अडचणी येतात. ह्या टीममध्ये एक सर्जन आहे जो ती गाठ नष्ट करणार आहे, त्याची एक सहाय्यक आहे, ह्या मिशनमध्ये येणाऱ्या अडचणींवर डोकं शांत ठेवून मार्ग काढणारा एक साहसी आर्मी ऑफिसर आहे ज्याला मानवी शरीरशास्त्रातील ओ की ठो कळत नाही आणि अजून देखील 2 सदस्य आहेत. त्यातला एक म्हणजे मायकेल आणि दुसरा पायलट. हे सगळे वेगवेगळे लोक एकत्र येऊन ह्या मिशनवर निघाले आहेत. दुसरी एक टीम जी डॉक्टर लोकांची आहे ती बाहेर म्हणजे बेन्सच्या सोबत कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. ह्या पूर्ण मिशनमध्ये सगळे महत्वाचे निर्णय 2 उच्च पदस्थ अधिकारी घेत आहेत. इतर कुठल्याही मिशनमध्ये असतो तसा एक फितूर यात देखील आहे तो नक्की कोण आहे हे माहिती नाही पण संशयाची सुई सर्जनवर आहे त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवायला आर्मी ऑफिसरला सांगण्यात आलंय.

सर्वप्रथम ही पाणबुडी जिचं नाव Proteus असं आहे, ती इंजेक्शन मार्फत बेन्सच्या शरीरात सोडली जाते. ती रक्तवाहिनी मध्ये असल्यामुळे अर्थातच लाल रक्त पेशी दिसायला लागतात. एका संथ गतीने Proteus पुढे जात असताना पहिली अडचण समोर येते. बऱ्याच वेळेस आपल्या धमन्या आणि शिरा म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या काही विचित्र कारणांमुळे एकमेकांशी जोडल्या जातात. असाच एक जोड नेमका पाणबुडीच्या मार्गात येतो आणि तिची नियोजित दिशा बदलते. आता एक पेच उभा राहतो कारण आता मागे फिरता येणं शक्य नसतं आणि पाणबुडी वेगाने हृदयाच्या दिशेने निघते. हे जास्त धोकादायक असतं पण पर्याय नसतो. पाणबुडी हृदयातून जाणार हे नक्की झाल्यावर आणखी एक धाडसी निर्णय घ्यावा लागतो तो म्हणजे काही वेळासाठी हृदयक्रिया बंद पाडणे. हृदयक्रियेमुळे पाणबुडीला हादरे बसून ती हृदयाच्या स्नायूंना इजा पोचवण्याची दाट शक्यता असते म्हणून विजेचा झटका देऊन हृदयक्रिया बंद पाडण्यात येते. हा प्रसंग मात्र छान जमून आला आहे. पाणबुडी हृदयाच्या जवळ आली की हृदयाचा विशिष्ट असा lub dub आवाज यायला लागतो. हृदयाच्या तालबद्ध ठोक्यांमुळे पाणबुडीला हादरे देखील एका लयीत बसायला लागतात. हे अभिनयातून छान दाखवले आहे इतकेच काय Proteus हृदयाच्या 2 झडपांमधून जाते त्या झडपा (valve) देखील हुबेहुब दाखवल्या आहेत. हृदयापासून निघणाऱ्या धमन्या आणि त्यांच्या जाळ्यातून पाणबुडी जात असतानाचे special इफेक्ट्स खूपच छान जमले आहेत. पाणबुडी हृदय आणि फुप्फुसे यांच्या सीमेवर येते आणि पायलटच्या लक्षात येतं की काही कारणाने इंजिनमध्ये हवेचा दाब कमी होतो आहे. अडचण फारशी मोठी नसते पण कुठूनतरी हवा भरून घेतली तर सुटू शकते. त्यांच्या लक्षात येतं की हवेचा स्रोत तर आपल्या पुढ्यातच आहे तो म्हणजे फुप्फुसे. मग ते पाणबुडी चक्क धमनीच्या तोंडाशी शब्दशः ‘पार्क’ करतात. इतक्या वेळ फक्त अवाक स्थितीत असलेला आर्मी ऑफिसर आता कृती करायला निघतो. फुप्फुसात असलेली हवा भरून पाणबुडीतील हवेचा दाब योग्य केला जातो पण एक छोटा अपघात होतो आणि ऑफिसर तोल जाऊन फुप्फुसात पडतो. ह्या सर्वांचा आकार अगदीच लहान असल्यामुळे श्वासोच्छ्वासामार्फत येणारी हवा ही त्यांच्यासाठी एका वादळासारखी भासते पण ते कसेबसे वाचतात. याठिकाणी फुप्फुसात साचलेले कार्बन कण दाखवले आहेत तसेच येणारी हवा ही धुळीसारखी दिसते असंही दाखवले आहे. हा प्रसंगही चांगला जमला आहे. या सर्व घटनांमध्ये बराचसा वेळ जातो त्यामुळे पुढील प्रवास वेगाने सुरू होतो इतक्यात लक्षात येत की गाठ नष्ट करण्यासाठी आणलेली लेसर गन कोणीतरी खराब केली आहे. घातपाताचा संशय खरा ठरलेला असतो. पुढे काय हा मोठाच प्रश्न उभा राहतो. बाहेरच्या टीमशी संपर्क करणारी एक यंत्रणा असते, त्या यंत्रणेचा एक घटक वापरून गन दुरुस्त होऊ शकते पण बाहेरच्या टीमशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. अशाही अवस्थेत मिशन सुरू राहतं. आता पाणबुडी वेगाने मेंदूकडे सरकत असते. पुढच्या टप्प्यात ते कानाच्या आतून पुढे जात असतात, तत्पूर्वी त्यांच्या वाटेत येतो आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेचा थांबा! आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेच्या विविध फळ्या असतात. बाहेरचा कुठलाही घटक, सजीव किंवा निर्जीव शरीराच्या आत आला की पहिली फळी त्याला सामोरी जाते. ह्या फळीतील घटक त्या बाहेरच्या घटकाला शब्दशः जखडून टाकतात आणि नष्ट करतात. रोगप्रतिकारक संस्थेची ही पहिली प्रतिक्रीया किंवा आक्रमण हे खूप जबरदस्त असतं. हे सगळं यात दाखवलं आहे. संपूर्ण चित्रपटात ह्या भागाचे स्पेशल इफेक्ट सर्वाधिक चांगले झालेले आहेत. ज्या पद्धतीने Antibodies येतात, बाह्यघटकाला जखडून टाकतात हे खूपच अफलातून पद्धतीनं दाखवलं आहे.

नेमकं काही antibodies पाणबुडीच्या वातानुकूलित यंत्रणेतील बाह्यभागाला विळखा घालतात आणि त्या यंत्रणेच काम थांबत. मग परत एकदा ऑफिसर आणि सर्जनची सहाय्यक बाहेर पडतात. यावेळेस पाणबुडी कानाच्या मागे पार्क केली जाते. बाहेरच्या खोलीमध्ये एकदम शांतता ठेवतात. कारण कुठलाही आवाज आणि त्यातून निर्माण होणारी कंपन यांच्या मार्गात अडथळा आणू शकतात. तरीपण चुकीने आवाज होतोच आणि निर्माण झालेली कंपने ह्यांच काम बिघडवतात. त्यात सहाय्यक जी असते तिचा तोल जातो आणि ती थेट कानाच्या पडद्यात जाऊन अडकते. पडद्यावर हे जे काही दिसतं ते आपल्या कल्पनेच्या पलीकडील आहे. लेखक, दिग्दर्शक यांनी कल्पनेच्या भराऱ्या खूप उंच मारल्या आहेत. मानवी शरीराच ज्ञान, त्यातील बारकावे दाखवण्याचा हा प्रयत्न जबरदस्त असाच आहे. अडकलेल्या सहाय्यकेला लवकरात लवकर वाचवणं गरजेचं होऊन बसत कारण आता ती रोगप्रतिकारक क्षमतेच्या नजरेत आलेली असते. कुठल्याही क्षणी Non Specific Antibodies तिच्यावर आक्रमण करू शकतात अशी परिस्थिती निर्माण होते. ऑफिसर तिला पाणबुडीपर्यंत आणण्यात यशस्वी तर होतो पण Antibodiesचा हल्ला मात्र टळत नाही. ह्या antibodies तिला जखडून टाकतात. सुदैवाने इतर टीमचे सदस्य वेळीच प्रयत्न करून तिला सोडवतात.तिचा जीव अगदी थोडक्यात वाचतो. संपूर्ण चित्रपटात मला हा प्रसंग सर्वात जास्त आवडला. रोगप्रतिकारक संस्था कशी काम करते हे खूप छान पद्धतीने दाखवले आहे. यानंतर जेव्हा ते मेंदूत नेमक्या ठिकाणी पोचतात तेव्हा त्यांच्याजवळ फक्त 6 मिनिटे उरतात. या 6 मिनिटात त्यांना गाठ नष्ट करून परत फिरायचे असते कारण ते ह्या सूक्ष्मरूपात फक्त 1 तासच राहू शकत असतात. यानंतर हळूहळू ते मूळ आकारात यायला सुरुवात होणार असते. वाढलेल्या आकारामुळे ते निश्चितच रोगप्रतिकारक संस्थेच्या भक्ष्यस्थानी पडणार असतात. ह्या 6 मिनिटात नेमकं काय नाट्य घडतं यात विज्ञानापेक्षाही रहस्य जास्त आहे. ते जरूर बघा.

जेव्हा विज्ञान आणि कल्पनाशक्ती एकत्र येतात तेव्हा एक छान कलाकृती नक्कीच निर्माण होते. 1966 साली चित्रपटातील तंत्रज्ञान फारसं प्रगत नसताना निव्वळ कल्पनेच्या जोरावर यातील स्पेशल इफेक्ट्स अफलातून आहेत. कला आणि स्पेशल इफेक्ट्स साठी या चित्रपटाला 2 ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत यातच सर्व काही आलं. दृश्य माध्यमात विज्ञान हे नेहमीच परिणामकारक असतं. दुर्दैवानं नंतरच्या काळात अशा कलाकृती फारच कमी बनल्या, अगदी नगण्य म्हणाव्या इतक्या. नंतरच्या काळात आलेले चित्रपट म्हणजे स्टार वॉर्स, जुरासिक पार्क, ट्रान्सफॉर्मर या चित्रपटांच्या मालिका किंवा एक्स मेन. यांच्या कथा विज्ञानावर आधारित असल्या तरी साधारणतः एकाच पठडीतील. त्या लक्षात राहतात त्या विज्ञानावर आधारित आहेत म्हणून नाही तर नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे म्हणून. त्यामुळे एक चांगला विज्ञानपट म्हणून हा चित्रपट नक्कीच लक्षात राहतो. या चित्रपटाच्या कथेचा मुख्य गाभा हा विज्ञानच आहे. 2 तासापेक्षाही कमी कालावधीचा हा चित्रपट थोडादेखील कंटाळवाणा होत नाही. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातुन काही गोष्टी खूप परिणामकारक अशा दाखवल्या आहेत. एका प्रसंगात आर्मीचा ऑफिसर कॉफी पित असतो त्याला खाली सांडलेल्या साखरेत एक मुंगी दिसते. तो तिला मारणार इतक्यात त्याचा विचार बदलतो कारण त्याच्या लक्षात येत की आपली एक टीम सध्याच्या क्षणाला ह्या मुंगीपेक्षाही लहान आकारात आहे. त्यामूळे लहान प्राणांच्या जीवाला देखील किंमत आहे. तंत्रज्ञान हे मानवी जीवनावर, विचारांवर किती खोलवर परिणाम करू शकत हे किती सहजतेनं दाखवलं आहे. शरीराच्या आत असताना रोज अनुभवत असलेल्या प्रक्रिया संपूर्ण टीमला खूपच जवळून बघायला मिळतात. त्या बघत असताना सर्जन अंतर्मुख होतो. ऑफीसरच्या प्रश्नांना त्याने दिलेली उत्तर ही अगदी मोजक्याच शब्दात असली तरी नक्की लक्षात राहतात. पाणबुडी हृदयात असताना ऑफिसर म्हणतो की हृदयाची धडधड किती कमी कालावधीत पूर्ण होते, तेव्हा सर्जन म्हणतो की हा कमी कालावधीच आपल्याला अनंत काळापासून वेगळा करतो. असे विचार करायला भाग पाडणारे अनेक संवाद यात आहेत. अशी अनेक अर्थाने वेगळी असणारी ही fantastic voyage एकदा तरी जरूर अनुभवा. विज्ञानाची तीच तर खरी गंमत आहे.

फोटो सौजन्य अर्थातच गुगल