Monthly Archives: July 2018

तुमच्या पोटात कोण आहे?

आपण निरोगी असणं नेमकं कशावर अवलंबून आहे?ह्या प्रश्नाचं नेमकं उत्तर बघायला गेलं तर कठीण आहे. कारण ते एका विशिष्ट गोष्टीवर किंवा घटकावर अवलंबून नाही. आपली जीवनशैली, आपला आहार, ऋतुमान, रोगप्रतिकारक क्षमता अशा अनेक घटकांवर ते अवलंबून असतं असं अगदी आतापर्यंत आपण मानत होतो. बऱ्याच अंशी ते खरं देखील आहे पण पूर्णपणे नाही. हे घटक बदलले तरी एक गोष्ट अशी आहे की जी आपल्या आरोग्याची सतत काळजी घेत असते आणि ती म्हणजे आपल्या पोटात असलेले सूक्ष्मजीव. आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक असलेले सूक्ष्मजीव आपल्या सर्वच गोष्टींवर लक्षणीय प्रभाव टाकत असतात. गेल्या काही वर्षात ह्याविषयीचं संशोधन नवनवीन गोष्टींवर प्रकाश टाकत आहे. या बाबतीत आपलं ज्ञान कसं प्रगल्भ होत गेलं याच उदाहरण म्हणजे सुरुवातीला आपल्या शरीरातील सगळ्यात मोठा अवयव हा यकृत मानला जायचा कालांतराने त्वचेला हा मान मिळाला आणि आता आपल्या शरीरातील सूक्ष्मजीव हा सगळ्यात मोठा अवयव मानल्या जातो. हो हे खरं आहे. सूक्ष्मजीव हे आपले अवयव आहेत. अगदी आपला स्वभाव देखील हे सूक्ष्मजीव निश्चित करतात असं संशोधन सांगत. हे सूक्ष्मजीव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे भारतात नुकताच झालेला एक अनोखा अभ्यास. आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्या पोटात देखील हे सूक्ष्मजीव असतात. साधारणतः 50 पेक्षा जास्त प्रकारचे सूक्ष्मजीव आपल्या पचन संस्थेच्या प्रत्येक अवयवासोबत उपस्थित असतात. त्यांची संख्या ही आपल्या एकूण पेशी संख्येच्या 10 पट असते. थोडक्यात आपल्या पोटात ह्यांचंच राज्य असतं. आपल्याला काय पचणार आणि काय रुचणार हे देखील हेच ठरवतात. आपल्याला आजार होणार की नाही आणि झाले तर कुठले होणार हे देखील त्यांच्याच अखत्यारीत येतं हे आताशा आपल्याला समजायला लागलंय.

भारतात ह्या प्रकारचं संशोधन वेग पकडतंय. ह्याच कारण म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोटातील सूक्ष्मजीवांचे प्रकार हे तिथला आहार, पाणी, हवामान इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतात. आपली बदलणारी जीवनशैली ह्यावर थेट प्रभाव टाकते आहे. पिढ्यानपिढ्या एका विशिष्ट आहाराची सवय असलेल्या पोटात आता नवनवीन पदार्थ जात आहेत आणि त्यामुळे ह्या शिलेदारांच्या पिढ्यांना धोका निर्माण झाला आहे. ह्या अभ्यासात एक सोपी गोष्ट करण्यात आली. दिल्लीपासून सुरुवात करून लेहपर्यंत विविध लोकांच्या पोटातील सूक्ष्मजीव कुठले आणि पर्यायाने कुठल्या लोकांचं आरोग्य अधिक चांगलं हे तपासण्यात आलं. तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. लेह मधील लोकांच्या पोटात सूक्ष्मजीव हे सर्वात जास्त समृद्ध होते. इतकंच काय दिल्लीपासून फक्त 40 किमी दूर असणाऱ्या वल्लभगड येथील लोकांच्या पोटात सुक्ष्मजीवांची संख्या सर्वात जास्त होती. ही निरीक्षणे खूप महत्त्वाची अशीच आहेत. कारण ह्या प्रकारचा अभ्यास भारतात प्रथमच झाला. आता पुढचा प्रश्न होता की ह्या निरीक्षणाचा अर्थ काय आणि त्याचे परिणाम काय? ह्याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळात असांसर्गिक आजारांच प्रमाण भारतात वाढणार आहे. हो आणि असं आता दिसायला देखील लागलं आहे. Inflammatory Bowel Syndrome, Irritable Bowel Syndrome, Crohn’s disease हे पाश्चिमात्य देशातील आजार मानले जातात. वर्षानुवर्षे हे आजार भारतीय लोकांना शिवले देखील नव्हते. पण ह्या आजाराचं प्रमाण आता भारतात प्रचंड वेगानं वाढतंय. ह्या अभ्यासात एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवण्यात आलं. लडाखच्या परिसरात गेल्या 10 वर्षात Irritable Bowel Syndrome चा एकही रुग्ण आढळला नाही. परंतु दिल्ली आणि इतर मोठ्या शहरात असे रुग्ण शेकड्यानी आढळतात. ह्याचा अर्थ एकच आपली नैसर्गिक सूक्ष्मजीव संस्कृती धोक्यात आली आहे.

बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयी वेगाने बदलल्या परंतु आपल्या पोटातील हे सांगाती ह्या सवयींशी जुळवून घेताना धडपडत आहेत. ह्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे. ह्यांचा अभ्यास जसजसा होत जाईल तसतसा भारतीयांच्या पोटात नेमकं कोण आहे हे कळायला लागेल.

सध्या तरी 4 प्रकारचे सूक्ष्मजीव हे प्रामुख्याने आढळले आहेत. त्यांच्या प्रमाणात देखील वैविध्य आहे आणि हे अपेक्षित देखील आहे. ह्याच एकमेव कारण म्हणजे भारतात असलेलं आहाराचं वैविध्य. विविध घटक असलेलं अन्न पचवण्यासाठी सुक्ष्मजीवांच राज्य देखील समृद्धच असणार यात शंका नाही. पण हे राज्य देखील आपल्या नवनव्या खाद्य पदार्थांमुळे उद्ध्वस्त होत आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे प्रतिजैविकांचा अवाजवी आणि विनाकारण होणारा वापर. प्रतिजैविके हे फक्त त्रासदायक सूक्ष्मजीवानाच नाही तर उपयोगी जीवांसाठी देखील धोकादायक असतात. पचनच नाही तर हे सूक्ष्मजीव इतर अनेक काम करत असतात. काही जीवनसत्वे ही आपल्याला अन्नातून देखील मिळत नाहीत ती ही सुक्ष्मजीव मोठ्या आतड्यात तयार करतात. आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणा तर ह्यांच्याशिवाय अगदीच कुचकामी आहेत. ह्या सगळ्या बाबी आपलं आरोग्य निश्चित करतात हे लक्षात घेता आपल्या पोटात कोण राहतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. नव्या जगाशी जुळवून घेताना आपल्या ह्या महत्वाच्या अवयवाकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. याचे परिणाम आत्ताच दिसायला लागले आहेत. वेळीच ह्याच गांभीर्य लक्षात घेतलं नाही तर आपल्या पोटात कोण राहत ह्याच उत्तर तितकंसं समाधानकारक असणार नाही आणि मोठ्या शहरांपेक्षा आपला गावच बरा गड्या हे म्हणायची वेळ येईल इतकं नक्की.

सर्व फोटो सौजन्य: गुगल