महान शास्त्रज्ञ डॉ कलाम!

डॉ कलाम हे नेमके कोण होते? ह्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात देणं अशक्य आहे. मी जर त्यांना Genius असं म्हणालो तर ते काही फार विशेष होते असं वाटणार नाही, कारण हा शब्द आपण आपण इतक्यांदा वापरतो कि तो आता गुळगुळीत न राहता मिळमिळीत झाला आहे. पण ह्याची व्याख्या पाहिली तर असामान्य निर्मिती क्षमता असणारी अशी व्यक्ती जिने एखाद्या क्षेत्रात नावीन्यपूर्व काम केलं आहे. हि व्याख्या कलाम ह्यांना तंतोतंत लागू होते, अर्थात ते ह्यापेक्षा कितीतरी अधिक होते. Genius हा त्यांच्या अनेक गुणांपैकी एक होता. पण इतकी महान व्यक्ती आपल्या काळात होती त्यामुळे कदाचित हे आपल्यापैकी काही जणांना झेपत नसेल. पण त्या निमित्ताने ते खरेच शास्त्रज्ञ होते का? असा प्रश्न पडू शकतो. हे जाणून घेण्यासाठी काही मूलभूत ज्याला मराठीत बेसिक म्हणतात अशा गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. एखाद्या विषयात संशोधन करणाऱ्या, त्या विषयात सध्या उपलब्ध असणाऱ्या ज्ञानात भर टाकणाऱ्या आणि सध्या असलेले प्रश्न सोडवण्यासाठी ज्ञानाची निर्मिती किंवा असलेल्या ज्ञानाचा वापर करणाऱ्या व्यक्तीला ढोबळमानाने शास्त्रज्ञ म्हणता येईल. अर्थात विषय कुठलाही असू शकतो तो विज्ञानच असला पाहिजे असं काही नाही, म्हणजे समाजशास्त्र, अर्थशास्त्र ह्या विषयात सुद्धा शास्त्रज्ञ असतात. पण सध्या कलामांविषयी बोलू. मी एक यादी बनवली आहे ती पहा, हि यादी कलामांच्या कामाची आहे. आधीच नमूद करतो कि हि यादी अपूर्ण आहे. संशोधनाचे ढोबळमानाने २ प्रकार असतात मूलभूत आणि उपयोजित. म्हणजेच Basic आणि Applied. दोन्ही प्रकारात डावं-उजवं करण्याची मुळीच गरज नसते कारण ते सारखेच महत्वाचे असतात. आईन्स्टाईनने मुलभूत संशोधन केलं होत तर एडिसनच संशोधन हे उपयोजित होतं तरी पण आपण दोघांनाही शास्त्रज्ञच म्हणतो. असो. यादीकडे वळू.
१. कलाम विद्यापीठात असताना प्रोजेक्ट म्हणून त्यांनी बनवलं होतं हॉवरक्राफ्ट. काय असतं हे? एकच असं वाहन जे जमीन, हवा, पाणी, चिखल अशा ठिकाणी जवळपास सारख्याच क्षमतेने चालू शकेल. असलं काही बनवणारे भारतातले ते पहिलेच. आणि त्याच नाव त्यांनी ठेवलं होत नंदी. हि त्यांच्या बुद्धिमत्तेची पहिली झलक. पुन्हा वाचा विद्यापीठात असताना प्रोजेक्ट म्हणून.
२. त्यांची मुख्य ओळख म्हणजे missile man. का असेल अशी ओळख? आज भारताकडे ब्राम्होस आहे एक अत्यन्त घातक क्षेपणास्त्र. ज्याची सध्या जगभर चर्चा आहे. पण हे असलं घातक क्षेपणास्त्र बनवण्याआधी Guided Missile म्हणजे थोडक्यात सांगायचं तर असं क्षेपणास्त्र जे पूर्णपणे नियंत्रित करता येऊ शकतं. ते आपण बनवलं होतं. ८०च्या दशकात. आणि एक दोन नव्हे तब्बल ५. त्यांच्या मागची पूर्ण संकल्पना, संशोधन आणि यशस्वीरित्या त्यांच्या चाचण्या करणाऱ्या टीमचे अर्ध्वयू होते डॉ कलाम.
३. आपल्याला आपल्या विषयात किती सखोल ज्ञान आहे ह्याच प्रामाणिक उत्तर फक्त आपण स्वतःलाच देऊ शकतो. कित्येकदा तर ज्ञान सोडा आपल्या विषयात काय चाललं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे इतर विषयाबाबतीत न बोललेलचं बरं. पण कलाम इथेच तर असामान्य ठरतात. वैद्यक हा तसा बघायला गेला तर त्यांचा विषय नाही. पण एकदा कलाम राजू स्टेण्ट असं गुगलून बघा. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या जर अरुंद होत गेल्या तर हृदयाचा झटका येतो तो येऊ नये म्हणून त्यांचा व्यास रुंद करण्यासाठी एक उपकरण ह्या धमन्यांमध्ये टाकले जात त्याला Stent म्हणतात. जीव वाचवणारे हे यंत्र सुरुवातीला अत्यंत महाग होते कलाम ह्यांनी तिथे सुद्धा संशोधनकरून अत्यंत कमी किमतीत ते विकसित केलं. ज्यामुळे आज भारतात सरकारला ते सर्वांसाठी उपलब्ध करता आलं.
४. भारतातल्या दुर्गम भागात डॉक्टरांना तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं म्हणून त्यांनी टॅब्लेट संगणक देखील ‘निर्माण’ केला आहे (कलाम-राजू टॅब्लेट).

तर हे चार मुख्य ‘शोध’ त्यांनी लावले आहेत. तशी यादी बरीच मोठी आहे. पण शंका दूर व्हावी म्हणून हि काही उदाहरणं. भारताची ओळख काय आहे? असं जर कोणी विचारलं तर ह्या अशा व्यक्ती ज्यांनी काम तर खूप मोठं केलं आहे पण त्यांच्याविषयी त्यांच्याच देशातल्या लोकांना अत्यल्प माहिती आहे, असं दुर्दैवाने म्हणता येईल. जाता जाता अजून एक गोष्ट, भारतातल्या आणि जगातल्या एकूण ४८ नामांकित विद्यापीठांनी त्यांना मानद PhD दिली आहे कारण त्यांना PhD देणं म्हणजे त्या विद्यापीठांना स्वतःचा सन्मान झाल्यासारखे वाटते. ह्यातच सर्व काही आलं. त्यामुळे डॉ कलाम हे शास्त्रज्ञ होते का ह्याविषयी निदान मी तर निःशंक आहे.