Monthly Archives: March 2018

हॉकिंग..एक निखळलेला दुवा..!!!

14 मार्च. तुमच्या माझ्याकरिता नेहमीसारखा उगवलेला दिवस. पण थोड्याच वेळात हा दिवस एक बातमी घेऊन आला. या बातमीने काळाला काही काळासाठी जागीच थोपवले. ‘A brief history of time’ हे पुस्तक लिहिणारा शास्त्रज्ञ, लेखक त्याच अनंत काळाच्या प्रवासाला निघून गेला. आपल्या जगण्याच्या रोजच्या वेगात ही बातमी थोड्या वेळासाठी अस्वस्थ करून गेली आणि हेच त्या महान शास्त्रज्ञाच यश आहे. विज्ञानाच्या आतापर्यंतच्या इतिहासात असा शास्त्रज्ञ झाला नाही जो प्रत्यक्ष एक शब्द देखील न बोलता आपल्याला खूप काही सांगून गेला. मानवाचा इतिहास हा त्याच्या जिज्ञासेचा इतिहास आहे. अज्ञाताच्या प्रदेशात जाण्याची त्याची ओढ ही त्याच्या रक्तातच आहे आणि सुदैवाने प्रत्येक टप्प्यावर असे द्रष्टे लोक लाभले जे आपल्याला बोट धरून अज्ञाताच्या प्रदेशात घेऊन गेले. हॉकिंग हे त्यापैकीच एक. त्यांच योगदान काय आणि त्यांच्या जाण्याने आपण नेमकं काय हरवलंय हे जेव्हा मी समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं जाणवलं की त्यांनी आपल्याला एका अंधाऱ्या बोगद्याच्या मध्यावर सोडून दिलं आहे. हा बोगदा आपल्याला न्यूटनने दाखवला, आईन्स्टाईनच बोट धरून आपण यात शिरलो आणि हॉकिंगच्या मागे मागे आपण चाललो होतो आणि आता पुढे काय त्यापेक्षा पुढे कुठे आणि कसं जायचं हे प्रश्न आहेत आणि सध्यातरी कोणाकडेच या प्रश्नांची उत्तरे नाहीत.

आपण कोण आहोत?आपण या विश्वात का आलो?हे विश्व आहे तरी कसं?ते निर्माण झालं?कोणी केलं?ते किती मोठं आहे?हे प्रश्न मानवाला सतत भेडसावत असतात आणि गेली अनेक वर्षे आपण त्यांचा धांडोळा घेतो आहोत कधी अध्यात्माच्या रूपाने तर कधी विज्ञानाच्या रूपाने. हे विश्व समजून घेण्याची ही प्रक्रिया जरी शेकडो वर्षे सुरू असली तरी त्याला खऱ्या अर्थाने सुरवात न्यूटनच्या कामाने झाली. न्यूटनने गतीचे नियम शोधले आणि काम एकदम सोपं झालं. अवकाश संशोधनाची वाट मोकळी झाली. आपण गती पकडली. हळूहळू प्रश्नांची उत्तरे मिळत होती. गुरुत्वाकर्षण समजायला लागले होते. या सर्व वाटचालीत प्रकाश हा महत्वाचा घटक होता. तोच खऱ्या अर्थाने सर्व बाबींवर प्रकाश टाकत होता. ताऱ्यांची अंतरे, आकाशगंगेची व्याप्ती, विश्वाचा आकार हे ही समजलं होतं आणि अचानकपणे प्रकाश आणि गुरुत्वाकर्षण यांच नात काय हा प्रश्न समोर आला. याच कारण म्हणजे प्रकाशाच गणित कुठेतरी चुकतंय हे लक्षात येत होतं पण नेमकं काय?न्यूटनचे नियम उपयोगाला येत नव्हते. तिथेच मदतीला आला आईन्स्टाईन. त्याने नेमकं उत्तर दिलं. गुरुत्वाकर्षण हे इतकं शक्तिशाली आहे की काही ठिकाणी ते प्रकाशाला आणि काळाला देखील वाकवत. ही गोष्ट एखाद्या बॉम्ब सारखी धडकली. त्यातून सावरायला लोकांना पुढची काही वर्षे लागली. कारण विश्वाची उत्पत्ती आणि विश्वाचं वय या दोन्ही गोष्टी समजून घेण्याची प्रक्रिया ही अजून किचकट होणार होती आणि तशी ती झाली देखील. विश्व प्रसरण पावतंय आणि त्यामुळेच बिग बँग थिअरी देखील मान्य पावत चालली होती (अजूनही ती पूर्णपणे स्वीकारण्यात आलेली नाही). आपले मराठमोळे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा अभ्यास याबाबतीत खूप मोलाचा आहे. या सर्व शोधांमुळे आपण विश्वाचं वय शोधून काढू शकतो असा विश्वास हळूहळू दृढ होत होता. पण यात एक मुख्य अडचण होती ती म्हणजे कृष्णविवरे अर्थात Black Holes. ह्या संकल्पनेने खूपच आव्हानं निर्माण केली होती. कारण कृष्णविवर म्हणजे गुरुत्वाकर्षांची खाण. इथे हे बल इतकं जबरदस्त असतं की प्रकाश तर सोडाच पण काळ देखील बाहेर नाही येऊ शकत. त्यामुळे ती शोधणार कशी? इथपर्यंतच्या कथेत हॉकिंग कुठेच दिसत नाहीत असंच तुम्हाला वाटत असेल तर थांबा. कथेच्या या टप्प्यावर त्यांचं कार्य येतं. हॉकिंगने इथला गुंता सोडवायला मदत केली. त्यांचा अभ्यास असा सांगतो की या महाकाय विवरामधून किरणोत्सर्ग बाहेर येऊ शकतो. त्याच स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं. झालं. हा देखील बॉम्ब होता. पण यावेळेस नासधूस कमी झाली कारण विज्ञान किती अशक्य आणि अतर्क्य असू शकतं हे आईन्स्टाईन या अवलियाने सिद्ध केलं होतं त्यामुळे असा काही किरणोत्सर्ग कुठे सापडतो का ह्याचा मागे लोक लागले आणि खरंच अशी किरणं सापडली. आणि त्याला नाव देखील देण्यात आलं.. Hawking Radiations. आता या विवरांचा अभ्यास थोडासा सोपा झाला पण अजूनही शु…कोणीतरी आहे तिथे अशीच परिस्थिती आहे.

विज्ञान मोठं गमतीशीर आहे. वर्तमान परिस्थितीला तुम्ही कोणते प्रश्न विचारता हे महत्त्वाचं. कारण ह्या प्रश्नांची उत्तरच आपली पुढची दिशा आणि वाटचाल ठरवत असतात. हॉकिंगचं मोठेपण इथेच अधोरेखित होतं. त्यांनी आपल्याला उत्तर तर सांगितलंच पण प्रश्न काय विचारायला हवेत हे देखील शिकवलं. स्वतःच्याच संशोधनाला त्यांनी प्रश्न विचारले आणि त्यात आणखी सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला. त्याचं महत्वाच संशोधन अगदी 2016 पर्यंत सुरू होतं. Soft Hair on Black holes असंच त्या संशोधनाला म्हणण्यात आलं. कृष्णविवरे समजून घेण्यात त्यांचं कार्य हेच निःसंशय दिशादर्शक आहे.

हॉकिंगचं कार्य इतकंच मर्यादित नाही. त्यांचं नाव उच्चारताच आपल्यासमोर येते त्यांची ती जगप्रसिद्ध खुर्ची. त्याला असलेल्या एका विशिष्ट विकारामुळे ते त्यांचं शरीर वापरू शकत नसत. मोटार न्यूरॉन डिसीज असं नाव असलेल्या विकारामुळे त्यांच्या मेंदूच त्यांच्या स्नायूंवर नियंत्रण नव्हतं त्यामूळे त्यांची सर्व काम ते त्याच खुर्चीवर बसून करत असत. त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षी या रोगाचं निदान झालं आणि त्यावेळेस तू फक्त 2 वर्षच जगशील असं त्यांना त्यांच्या डॉक्टरनं सांगितलं होतं. पण स्वतःच्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तिवर त्यांनीे जगाला अशक्य असं काम करून दाखवलं. ह्या विकारासोबत सर्वात जास्त काळ जगलेली व्यक्ती अशी त्यांची नोंद वैद्यकीय क्षेत्राने घेतली. हे देखील एक आश्चर्यच आहे. ही गोष्ट इतकी अविश्वसनीय आहे की काही डॉक्टर आता असंही म्हणत आहेत की त्यांच्या रोगाचं निदानच चुकीचं झालं होतं. स्वतःच्या या शारीरिक आव्हानांवर मात करून ते जगभर फिरले. व्याख्यान दिली. आपला विषय लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगितला. त्याचा विषयाचा हातखंडा, त्याच्याविषयी असलेलं कुतूहल यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांचं म्हणणं समजून घेण्याचा लोक प्रयत्न करायचे. त्यावर जगभर चर्चा होत असे. अशी लोकप्रियता लाभलेला आईन्स्टाईन नंतरचा एकमेव शास्त्रज्ञ म्हणून स्टीफनची इतिहासात नोंद होईल.

हे विज्ञान सर्वांपर्यंत पोचावं म्हणून त्यांनीे पुस्तकं देखील लिहिली. ‘The Brief History of Time’ हे त्यांचं पुस्तक तुफान गाजलं आणि हेच पुस्तक त्यांची ओळख बनलं. अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेलं हे पुस्तक जगभर वाचल्या जातं. ‘Science Communication’ या क्षेत्रात त्यांनी केलेलं हे काम भल्याभल्याना जमलेले नाही. उपलब्ध ज्ञानाच्या आधारावर एकच सिद्धांत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न अफलातून होता. ‘The theory of everything’ असं ते त्याला म्हणत असत पण त्यांचा हा प्रयत्न दुर्दैवाने त्यांच्या मनाप्रमाणे काही जमून आला नाही. परग्रहवासी, पृथ्वीचं भविष्य या विषयांवर त्यांची मतं आजही अभ्यासली जातात.

भारताशी त्याचा संबंध खूपच घनिष्ठ होता. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर, डॉ चित्रे, टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्यासोबत तो नेहमी काम करत असे. जगभरच्या शास्त्रज्ञांप्रमाणे भारतीय शास्त्रज्ञांना देखील त्यांचं बहुमोल मार्गदर्शन नेहमीच लाभलं. ते भारतात यायचे. रतन टाटा त्यांना एकदा भेटले आणि हा आपला बहुमान आहे असं ते त्यांना म्हणाले होते.

विज्ञानात इतकं काही करून दिव्यांग लोकांसाठी देखील त्यांनी खूप कार्य केलं. ते भारतात आले असताना TIFR मध्ये त्यांचं व्याख्यान होतं ते बऱ्याच वेळ लांबल. त्यांना भेटायला काही दिव्यांग लोक आले होते. व्याख्याना नंतर प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा आलेला असताना देखील ते त्यांना आवर्जून भेटले. ते शास्त्रज्ञ म्हणून जितके मोठे होते तितकेच माणूस म्हणून देखील. त्यांची काही विधान खूप प्रसिद्ध आहेत. ‘मी मरणाला भीत नाही पण मला मरण्याची घाई देखील नाही’ हे वाक्य त्यांचं आयुष्यावरील प्रेम दाखवत. स्वतःच्या शारीरिक मर्यादा त्यांनी कधीही स्वतःच्या प्रगतीच्या आड येऊ दिल्या नाहीत. अनेक मान-सन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या आयुष्यावर 2014 मध्ये एक चित्रपट देखील आला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीने लिहिलेल्या पुस्तकावर आधारित होता.अशा या माणसाच्या जाण्याने आपल्याला भविष्यासाठी जोडणारा दुवा निखळला आहे. पण ही खात्री देखील आहे की त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन असे अनेक दुवे निर्माण होतील जे ही उणीव भरून काढतील. दूरच्या प्रवासाला गेलेल्या या व्यक्तीसाठी आपण एकच म्हणू शकतो…’शुभास्ते पंथान: सन्तु।’