Monthly Archives: July 2020

औषध जन्माला येताना! भाग २

मागच्या भागात आपण पाहिलं की नवीन औषधाचे संशोधन कसे सुरू होते. त्यामागे कुठल्या आर्थिक, वैज्ञानिक आणि इतर बाबी महत्वाच्या असतात. आता जाणून घेऊ प्रत्यक्ष संशोधनाचे टप्पे! ह्याचे 2 टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर नेमकं काय केलं जातं? त्यांचं महत्व काय? प्राण्यांवर चाचण्या कोणत्या भागात होतात? ह्या आणि इतर अनेक बाबींची चर्चा आपण ह्या भागात  करू. ह्या चर्चेतून हे लक्षात येईल की हे संशोधन किती क्लिष्ट आणि अनिश्चित आहे.

आधी नमूद केल्याप्रमाणे नवीन औषध निर्मिती ही वेळखाऊ बाब आहे. कुठल्याही कंपनीला नव्या औषधांच्या बाबतीत हलगर्जीपणा करता येत नाही. कारण एखाद्या क्षुल्लक कारणासाठी देखील त्या औषधाचा प्रवास कुठल्याही टप्प्यावर कायमचा थांबू शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष मानवावर चाचण्या करण्यापूर्वी प्रयोगशाळेत ह्या भ्रूण औषधावर विविध प्रयोग केले जातात. ह्या प्रयोगांचे दोन मुख्य उद्देश्य असतात. पहिला म्हणजे ह्या औषधांविषयी अभ्यास करून ह्या औषधांविषयी ज्ञान निर्माण करणे. ही औषधे नवीन असल्यामुळे त्यांचे औषधी गुणधर्म हे पूर्णपणे अज्ञात असतात. त्यामुळे ही औषधं प्रत्यक्षात जेव्हा एखाद्या पेशीच्या संपर्कात येतील तेव्हा काय काय होईल हे समजणे गरजेचे असते. इतिहासात अनेक उदाहरणं अशी आहेत की एका विशिष्ट आजारावर बनत असलेले औषध एखाद्या दुसऱ्याच विकारावर जास्त परिणामकारकरीत्या वापरता येऊ शकते असे आढळले आहे. अशा प्रकारची उदाहरणं लेखात पुढे येतीलच पण ही शक्यता लक्षात घेऊन कित्येक प्रयोग हे सतत केले जातात कारण हेच की अशी कुठलीही संधी चुकून सुद्धा हातातून जाऊ नये. कारण एकाच कंपनीचे औषध ज्यावर संशोधन चालू आहे त्याच्या स्पर्धक कंपन्या देखील त्यावर संशोधन करतच असतात. ह्यासाठी त्या औषधांच्या ज्ञात आणि अज्ञात गुणांचं स्वामित्व हक्क अर्थात पेटंट मिळवणं हे फार गरजेचं होऊन बसत त्यासाठी सतत वेगवेगळे प्रयोग करणं हेदेखील आवश्यक बनतं त्यामुळे प्रयोगशाळेचा टप्पा हा सुरुवातीला प्रचंड महत्वाचा असतो.

ह्या प्रयोगांचा दुसरा महत्वाचा उद्देश्य हा खूपच कस लावणारा असतो. इथे जर चूक झाली तर अपयशाची शक्यता खूपच वाढते आणि सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडतं. तो म्हणजे ह्या औषधावर असे प्रयोग करणं जेणेकरून मानवी शरीरात ह्या औषधांचं काय होईल ह्याचा जास्तीत जास्त अंदाज लावता येईल. हो, कितीही प्रयोग केले तरी मानवी शरीरात काय होईल ह्याचा फक्त अंदाजच बांधता येतो आणि तोदेखील कितपत बरोबर येईल हा शब्दशः आतबटट्ट्याचा व्यवहार होईल अशी शक्यता असते. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर, मानवी शरीराच्या बाबतीत आतापर्यंत निर्माण झालेलं ज्ञान आणि त्यात रोजच्या रोज पडणारी भर ह्या सगळ्या बाबींचा ताळमेळ घालणं ही नव्या औषध संशोधनातली अत्यंत क्लिष्ट अशी आव्हानं आहेत. प्रयोगशाळेचा टप्पा हा अगदी काटेकोर असावा ह्यासाठी विविध तज्ञांची फौज सगळं कौशल्य पणाला लावत असते ह्यात मुख्यत्वे असतात रसायनशास्त्रज्ञ, औषधनिर्माण शास्त्रातले तज्ञ, माणसांचे तसेच प्राण्यांचे डॉक्टर, वनस्पतीतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, जैवतंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ञ इतकंच काय अभियंते सुद्धा! कारण कित्येक अभियंते वेगवेगळे तंत्रज्ञान निर्माण करून ह्या प्रक्रियेला चांगलाच हातभार लावत असतात.

ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांतून सुरू होते प्रयोगांची साखळी. ह्या साखळीतला प्रत्येक दुवा हा पुढच्याशी तसेच इतर दुव्यांशी जोडलेला असतो. कसा ते समजून घेऊ.

पहिला टप्पा- प्रयोगशाळा!

कुठल्या विकारावर, रोगावर किंवा आजारावर औषध संशोधन होणार आहे हे ठरल्यानंतर हा टप्पा सुरू होतो. त्याचवेळी बाजारात ह्या रोगांवर औषध उपलब्ध देखील असतात पण त्यांच्या काही मर्यादा देखील असतात. ह्या मर्यादेसोबत राहूनच त्या औषधांचा वापर होत असतो. उदाहरणार्थ कर्करोग. वेगवेगळ्या कर्करोगांवर विविध औषधं उपलब्ध आहेत. पण ह्यातली जवळपास सर्वच औषधं आपल्या नेहमीच्या भाषेत सांगायचं तर side effects दाखवतात. कारण त्यांचं मुख्य काम हे कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याचं असतं. हे होत असताना कितीतरी चांगल्या पेशी अपरिहार्यपणे ह्या औषधांकडून नष्ट होत असतात त्यामुळे केस झडणे, वजनात प्रचंड घट होणे, दृष्टी अधू होणे असे अनेक प्रकार ह्या उपचारांमुळे होतात पण कर्करोगात रोग्याचा जीव वाचवणे ही पहिली गरज असते त्यामुळे ह्या सगळ्या बाबींना नाईलाजाने स्वीकारावे लागते. त्यामुळे side effect शिवाय औषध ही कर्करोगातली खरी गरज आहे आणि कितीतरी कंपन्या ह्यावर संशोधन करत आहेत. कारण अशा कमी विषारी किंवा बिनविषारी औषधांची बाजारपेठेतील किंमत कितीही असू शकते. दुसरं उदाहरण म्हणजे प्रतिजैविके किंवा antibiotics. जिवाणूंमध्ये वाढणारा प्रतिजैविकांना प्रतिरोध हा जागतिक पातळीवर चिंतेचा विषय आहे. ह्या अडचणींवर उत्तर म्हणून नव्या प्रतिजैविकांच संशोधन देखील जोरात सुरू आहे. विषाणूजन्य आजारांवर आजदेखील लसीकरण हाच उपाय जास्त प्रमाणात वापरला जातो. त्यामानाने antiviral औषधांच प्रमाण नगण्य आहे. आज आपण पाहतो आहोत की लस उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण जगाची काय अवस्था झाली आहे. ह्या अनुभवामुळे antiviral औषधांवर होणारं संशोधन नक्कीच वाढेल ह्यात शंका नाही. उपलब्ध औषधांमध्ये अशा ज्या कमतरता असतात त्यांना Unmet Clinical Need असं म्हणलं जातं. औषधी कंपन्या त्यावरच आपलं संशोधन केंद्रित करत असतात. अशा उपलब्ध औषधाची मर्यादा लक्षात घेऊन नेमकी गरज काय आहे हे निश्चित केले जाते. म्हणजे कॅन्सरच्या अशा औषधावर संशोधन केलं जातं ज्यात विषारी गुणधर्म कमीत कमी असतील. असं प्रतिजैविक शोधण्याचा प्रयत्न होतो की ज्याला उशिराने प्रतिरोध निर्माण होईल, इत्यादी. आजच्या भाषेत जर थोडक्यात सांगायचं झालं तर कोरोना विषाणूवर लस नसणं ही Unmet Clinical Need आहे. त्यामुळे त्यावर संशोधन होणार.

उपलब्ध औषधांच्या मर्यादा आणि नेमकी गरज ह्या बाबी एकदा स्पष्ट झाल्या की पुढच संशोधन सुरू करण्यासाठी 2 पर्याय असतात. पहिला म्हणजे उपलब्ध औषधांच्या रासायनिक संरचनेत काही बदल करून त्याला नवे गुणधर्म प्राप्त करून देणे आणि दुसरा म्हणजे पूर्णपणे नावीन्य रासायनिक संरचना असणारी औषधं शोधणे. सर्वसाधारणपणे पहिला पर्याय जास्त वापरला जातो. कारण ह्या पर्यायामध्ये अनिश्चितता तुलनेने कमी असते आणि नव्या आणि जुन्या औषधाचे गुणधर्मामध्ये रासायनिक संरचनेच्या साधर्म्यामुळे फार तफावत आढळत नाही. संशोधनाचा कालावधी देखील कमी होतो. पण ह्याउलट पूर्वीच्या औषधासोबत असणारे काही नको असलेले गुणधर्म देखील टाळता येत नाही हे वास्तव देखील स्वीकारावे लागते.

दुसरा प्रकार हा जास्त कठीण आहे. ह्यात संपूर्णपणे नव्या रासायनिक संरचना निवडून, कल्पकता वापरून तर कधीकधी नैसर्गिक स्रोतांवर संशोधन करून औषध शोधलं जातं. ह्यात वेळ जास्त लागतो. अनिश्चितता खूप असते आणि प्रयोग पण जास्त करावे लागतात. पण इथे जुन्या औषधांपासून असणाऱ्या काही नकोशा बाबींपासून सुटका मिळण्याची शक्यता असते. ह्या प्रकारचं संशोधन औषधांच्या विविध शाखांमध्ये सुरुवातीला म्हणजे 1950-1980 च्या काळात साधारणपणे झालं. त्यातूनच विविध औषधांची निर्मिती झाली. त्यामध्ये औषधी कंपन्यांचा वाटा खूप मोठा आहे. नंतर हे संशोधन जसजसं सुसंगत आणि सुसंघटित होत गेलं तसतसं एकाच औषधाचे विविध गुणधर्म शोधणे, त्यांचे नवनवीन कल्पक वापर शोधणे ह्या बाबींवर जास्त लक्ष देण्यात आलं. त्यामुळे दुसरा प्रकार हा इतर नवीन मार्गाने हाताळला जाऊ लागला. आज ह्या वाटेवर जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झाला आहे. येणाऱ्या काळात हा प्रकार जास्त हाताळला जाईल अशी शक्यता निर्माण होते आहे.

अशा प्रकारे औषधाची नेमकी गरज, त्यावर नेमके कसे संशोधन करायचे हे निश्चित झाल्यावर प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात होते. विविध शाखांमध्ये त्यांच्या गरजेनुसार संशोधनात बदल होत असतात, त्यानुसार त्यांच्या गरजा आणि लागणारे तज्ञ देखील वेगवेगळे असतात. असं असलं तरी मुख्य संकल्पना थोड्या फार फरकाने सारखीच असते. ही संकल्पना विस्तृतपणे पुढच्या भागात समजून घेऊ.

क्रमशः

सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने!