Monthly Archives: November 2019

राखीगढीचा ‘सापळा’!

राखीगढी हे हरियाणा राज्यातलं आजच एक छोटं गाव सध्या पूर्ण जगात चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. त्याला कारणंही तसंच आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या एका समृद्ध संस्कृतीचा भाग असणारं हे गाव पुरातत्त्व खात्याच्या दृष्टीनं नेहमीच महत्वाचं राहिलं आहे. इथे सापडणारे ह्या संस्कृतीचे अवशेष जगभरातील संशोधक त्याच्या शोधापासून करत आहेत. इतिहासातील अनेक प्रश्नांचा मागोवा इथेच संपतो असा अनुभव आहे. ह्यात मुख्यत्वे इंडो युरोपियन भाषांचा उगम आणि प्रसार, शेतीचा शोध आणि प्रसार तसेच आर्यांचं मूळ स्थान कुठलं? हे प्रश्न नेहमीच अग्रस्थानी राहिले आहेत. ह्या अवशेषांचा अभ्यास फक्त पुरातत्त्व दृष्टीनेच न करता त्याला विज्ञानाची जोड देण्याचे प्रयत्न गेल्या काही झाले आणि ह्या प्रश्नांची खात्रीलायक उत्तरं मिळण्यास सुरुवात झाली. असाच एक प्रयत्न भारत, अमेरिका आणि युरोप ह्या देशातील संशोधकांनी एकत्र येऊन गेल्या काही वर्षात राबवला आणि ह्या प्रयोगाचे निष्कर्ष नुकतेच समोर आलेत. पुरातत्व शास्त्राच्या ह्या नव्या प्रयोगाने नेमकं काय साधलं? ह्या निष्कर्षानी कुठले प्रश्न सोडवले? हे निष्कर्ष सर्व आक्षेपांची उत्तरं देतात का? ह्या प्रयोगाने आपली इतिहासाची दृष्टी बदलणार आहे का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा प्रयोग समजावून घेण्याचा हा प्रयत्न..

बरोबर 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1920 मध्ये हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले. त्यानंतर पंजाब, हरियाणा ह्या भागात अनेक ठिकाणी असे अवशेष संशोधकांना सापडले. तेव्हापासून आजतागायत इथले अवशेष हे नेहमीच संशोधकांना खुणावत आले आहेत. इथे सापडणारे सापळे हे अनेक गृहितकांना नेहमीच आव्हान देत आले आहेत. असंच एक प्रसिद्ध गृहितक म्हणजे शेतीचा उगम हा anatolia ह्या भागात म्हणजेच आजच्या तुर्की ह्या देशात झाला. तिथून शेती जगभर पसरली. दुसरं गृहितक म्हणजे इंडो युरोपियन भाषांच्या उगमाबाबतीत! ह्या भाषांचा उगम नेमका कुठे झाला ह्यावर तज्ञांचं अजूनही एकमत होऊ शकलेलं नाही. हा प्रयोग होईपर्यंत हडप्पा संस्कृतीमध्ये होत असलेली शेती ह्याच anatolia भागातून आलेल्या लोकांकडून इथल्या लोकांनी शिकली असावी असा अंदाज होता. ह्या मागचं कारण म्हणजे पुरातत्व शास्त्राची असणारी मर्यादा. कुठलेही जीवाश्म किती जुने आहे? त्याचा काळ कुठला? हे पुरातत्व शास्त्र सांगू शकत नाही. त्यासाठी विज्ञानाची गरज असते.

आधी सांगितल्याप्रमाणे शेतीचा उगम हा आजच्या तुर्की आणि इराण ह्या दोन देशांमध्ये इसवी सन पूर्व ७०००-६००० मध्ये झाला असं मानणारे संशोधक बहुसंख्येने आहेत. त्याचबरोबर असाही एक मतप्रवाह आहे की जगात शेती ही वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावली. पण परत प्रश्न तोच पुरावा काय? परंतु ह्याच प्रश्नाचं उत्तर बहुतांशी प्रमाणात राखीगढीच्या सापळयाने दिले आहे. हडप्पा संस्कृतीचा काळ हा इसवी सन पूर्व २७०० ते १२०० इतका मानल्या जातो. पण ह्या सापळ्याच वय साधारणपणे 4500 वर्षे इतकं निश्चित करण्यात आलंय. मुळात आधी हे स्पष्ट करायला हवं की हडप्पा संस्कृतीपेक्षाही जुन्या असणाऱ्या संस्कृतींचे अवशेष स्वतंत्र भारतात सापडले आहेत. राखीगढी हे गाव त्या संस्कृतींपैकी एक असं आहे. राखीगढी इथे असणारी संस्कृती ही हडप्पा आणि मोहेंजोदडो पेक्षाही जुनी होती. ह्या नागर संस्कृतीतील एक महत्त्वाचं शहर म्हणजे तेव्हांच राखीगढी! ह्या एका सापळ्यामुळे काही प्रश्नांची उकल होते तर काही नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. मुळात हा काही पहिला सापळा नाही जो या ठिकाणाहून सापडला आहे, मग ह्याच महत्व आहे तरी काय?

पुरातत्व खात्यामार्फत ह्या भागात सतत काम सुरू असतं. इथल्या जीवाश्म अवशेषांच वय शोधून काढणं हे महाकठीण काम मानलं जातं. इथले जीवाश्म म्हणजे ह्या संस्कृतीत दफन केलेले मृतदेह. इतक्या वर्षांनंतर आता स्वाभाविकच फक्त त्यांचे सापळे मिळतात परंतु ह्या सापळयामधून DNA मिळवणं हे जवळपास अशक्य असतं. ह्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या भागातील समशीतोष्ण वातावरण! ह्या वातावरणात सापळ्यांमधील उपयुक्त DNA जवळपास नष्ट होऊन जातो त्यामुळे ह्या मृतदेहांविषयी नेमकी माहिती मिळवणं अशक्य होऊन जातं. २०१५ मध्ये ह्या प्रयोगातील हा महत्वपूर्ण सापळा सापडला. अंदाजे 40-45 वयाच्या स्त्रीचा हा सापळा सापडलेल्या 61 सापळयांपैकी एकमेव होता त्याच्यातून उपयुक्त DNA शास्त्रज्ञांना मिळवता आला. हा DNA सापळ्याचा कानातून असलेल्या भागातून मिळवण्यात तंत्रज्ञांना यश आले. उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण DNA मिळवण्यासाठी जवळपास १०० प्रयत्नानंतर यश आले आहे.

इतक्या सगळ्या प्रयत्नानंतर मिळालेल्या जनुकीय नमुन्यांची तुलना तुर्कमेनिस्तान आणि इराण येथे आधीच सापडलेल्या ११ जनुकीय नमुन्यांसोबत करण्यात आली.तुलना ह्याच नमुन्यांसोबत करण्यामागे कारण काय? ह्याच उत्तर परत एकदा इतिहासाच्या उदरात सापडतं. हडप्पाचे अवशेष सापडण्यापूर्वी भारताला काही एक संस्कृती आहे असं इंग्रजांना आणि इंग्रजी संशोधकांना वाटतंच नव्हतं. त्यामुळे हे जे काही अवशेष आहेत ते एका स्वतंत्र, समृद्ध आणि इथल्याच मातीतील संस्कृतीचे आहेत हे त्यांना सहजासहजी मान्य झालं नाही. त्याचवेळी मध्य आशिया म्हणजे आताचा तुर्की, तुर्कमेनिस्तान आणि इराणचा भाग इथे देखील काही अवशेष सापडले होते, जे काही बाबतीत ह्या संस्कृतीशी साधर्म्य दाखवणारे होते जस की मातीची भांडी, घरांची आणि शहरांची रचना इत्यादी. त्यामुळे सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांच्या आधारे ह्या मध्य आशियायी लोकांचेच स्थलांतर हडप्पा आणि इतर भागात झाले असा एक निष्कर्ष तेव्हा काढण्यात आला. पण ही बाब लक्षात घेतली पाहिजे की हे निष्कर्ष मुख्यत्वे पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे काढण्यात आले होते. त्याकाळी म्हणजे १०० ते १५० वर्षांपूर्वी विज्ञान आजच्या एवढं प्रगत नव्हतं. त्यामुळे हे निष्कर्ष विज्ञानाच्या मदतीनं पडताळून पाहणं शक्य नव्हतं. पण आता ही अडचण दूर झाली आहे आणि कुठलीही शक्यता आता विज्ञानाच्या मदतीने निश्चित करता येऊ शकते.

इतिहासामध्ये असणाऱ्या ह्या घटनाक्रमाला पाहता सापडलेल्या सापळ्याचे पूर्वज कोण? हा प्रश्न महत्वाचा होता म्हणजे तिथे असणाऱ्या लोकांची वंशावळ नेमकी कोणती? हे जाणून घेणं गरजेचं होतं. त्यावरून बऱ्याच बाबींचा आणि घटनांचा अर्थ लागणार होता. राखीगढी इथली संस्कृती मध्य आशियामधून स्थलांतरित झालेल्या लोकांनी विकसित केली होती का? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता वाढली. जेव्हा जनुकीय पृथकरणाचे निकाल हाती आले तेव्हा नवीनच माहिती समोर आली.

राखीगढी इथे असणाऱ्या लोकांच्या आणि इराणमध्ये सापडलेल्या अवशेषांच्या जनुकीय रचनेत बरीच तफावत आढळून आली. तरीपण संशोधकांनी ह्या वंशावळीचा उल्लेख इराणसदृश्य असाच केला. पण त्यांना अजून एक महत्वाची गोष्ट आढळली ती म्हणजे ह्या जनुकीय रचनेचा आणि दक्षिण आशिया मधील लोकांच्या जनुकीय रचनेत खूपच साधर्म्य आढळून आले. ह्या लोकांचे पूर्वज कदाचित इराणच्या पठारावर राहत असावेत अशी एक धूसर शक्यता आहे पण सध्याची माहिती त्यांचं ठिकाण दक्षिण आशिया असण्याची शक्यता जास्त प्रमाणात व्यक्त करते. राखीगढी इथली ही वंशावळ इराणच्या वंशवेलीपासून साधारणपणे ख्रिस्तपूर्व 8000 मध्ये विभक्त झाली हा निष्कर्ष मात्र ह्या निकालांनी खात्रीने देता येतो.

शेतीचा उगम हा ख्रिस्तपूर्व 7000-6000 हा मानला जातो. त्यामुळे शेतीचा शोध हा ही वंशावळ इराणमधील लोकांपासून वेगळी झाल्यानंतर लागला आहे हे समजतं. ह्याचाच अर्थ संशोधकांनी असा काढला आहे की सध्याच्या दक्षिण आशियातील शेतकऱ्यांचा आणि इराण मधील आद्य शेतकऱ्यांचा संबंध नसल्यात जमा आहे. ह्या जनुकीय पृथकरणातून असंही सांगता येतं की दक्षिण आशियात शेती ही स्वतंत्रपणे विकसित झाली आणि इराण मधून आलेल्या शेतकऱ्यांनी ती विकसित केली असल्याची किंवा इथल्या लोकांना शिकवली असल्याची शक्यता जवळपास नाहीच.

त्यामुळे इथे असणाऱ्या लोकांचे पूर्वज हे मूळचे इथलेच होते असं म्हणायला सध्या वाव आहे. मध्य आशियातून दक्षिण आशियात स्थलांतर झालं नाही असं म्हणता येत नाही पण हे स्थलांतर होण्यापूर्वी देखील एक संस्कृती इथे नांदत होती इतकाच अर्थ ह्या सापळ्याच्या DNA मधून संशोधकाच्या टीमने तूर्तास काढला आहे. अजूनही काही निष्कर्ष येणाऱ्या काळात मिळण्याची शक्यता आहे हे निश्चित! यामध्ये इंडो युरोपियन भाषांचा उगम ह्यावर कदाचित अजून प्रकाश पडू शकतो असाही विश्वास संशोधकांना वाटतो. विज्ञान तिथे देखील मदतीला असेलच ह्यात शंका नाही. परंतु राखीगढीचा हा ‘सापळा’ अजून काय काय बोलतो हे ऐकण्याची उत्सुकता वाढली आहे इतकं मात्र नक्की!