Monthly Archives: March 2017

क्रिकेट आणि भारतीयत्व

कालच भारत-ऑस्ट्रेलिया या दोन पारंपरिक संघामधील बॉर्डर-गावसकर हि मालिका संपली. हि मालिका भारताने 2-1 अशा फरकाने जिंकली. माझ्यासारख्या क्रिकेट फॅन्स या मालिकेचे खूप वाट पाहत असतात. मालिका भारतात होणार असेल तर सोन्याहून पिवळे. जितका आनंद पाकिस्तान हारल्यावर होतो त्या पेक्षा किंचित कमी आनंद ऑस्ट्रेलिया हारल्यावर होतो. ऑस्ट्रेलिया सोबतची आपली हि खुन्नस खुप वर्षांपासून आहे. वेस्ट इंडिस आणि ऑस्ट्रेलिया नंतर आपल्याकडेच विश्वकप राहिला आहे. आणि इतरही वर्षभर चालणाऱ्या स्पर्धांमध्ये आपण ऑस्ट्रेलियाला डोकेदुखीच आहोत आणि अर्थातच ते पण आपल्याला. मुळात ऑस्ट्रेलिया आपल्यासारखाच commonwealth देश. त्यामुळे क्रिकेट हा तिकडे पण प्रचंड लोकप्रिय. इतका आवडीचा कि तो त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे. हे कांगारू मूळचे ब्रिटिश त्यामुळे त्यांचे गुणसूत्र यांच्यांत पण आहेत..आक्रमकता हा त्यातला ठळक. ब्रिटिश भारत सोडून गेले याला आता 70 वर्षे झाली. दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. भारतानं काही क्षेत्रात खूप आघाडी घेतलीय यांच्यापेक्षाही जास्त. आणि हीच बाब या गोऱ्यांच्या डोळ्यात खुपते. क्रिकेट हि तर त्यांच्या काळजातली ठेव. पण बोब अशी की इंग्लंडला एकदाही विश्वकप जिंकता आलेला नाही. आणि ऑस्ट्रेलिया सगळी पृथ्वी जिंकतो आणि भारतासमोर त्यांचं काही चालत नाही. आम्ही जगजेत्ते आहोत हे ते उघडपणे सांगतात फक्त इतकीच खात्री करतात की भारतातुन कोणी ऐकत नाही ना? ऑस्ट्रेलिचा सगळा माज भारताने कित्येकदा उतरवला आहे पण ही जित्याची खोड काही केल्या जात नाही. या वेळेस देखील परत तोच रडीचा डाव या कांंगारूंनी खेळला पण या वेळेस त्यांची जगभर नाचक्की झाली आणि अभिमानाची बाब अशी की आपल्या खेळाडूंनी आपलं भारतीयत्व इतक्या छान आणि समंजसपणे निर्भीडतेने सिद्ध केलयं कि त्याला तोड नाही. नेहमीप्रमाणे कांगारूनी मालिका सुरु होण्यापूर्वीपासून शाब्दिक युद्ध सुरू केलं. हा त्यांचा उद्दामपणा जो त्यांच्या रक्तात आहे पण आपला कर्णधार शांत होता हे आपल्या परंपरेला साजेसच. आपल्या कुठल्याही कर्णधाराने किंवा खेळाडूने कधीहि संयम सोडला नाही. हा इतिहास ते बिचारे विसरतात. कारण आपल्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन. फक्त खेळाडूच नाही तर तिथले वर्तमानपत्र आणि क्रिकेट बोर्ड देखील या कोल्हेकुई मध्ये शामिल झाले होते आणि त्यांच्या निशाण्यावर होता विराट. त्यांनी इतकी धास्ती घेतली आहे या कॅप्टनची कि विचारता सोय नाही. पण हा पठ्ठा पण काही कमी नाही त्याने ह्यांची चांगलीच जिरवली. त्या बाबतीत हा आपल्या सचिनचा वारसदार आणि धोनीचा देखील. त्याने आपल्या खेळानेच या सगळ्या गोष्टींना चोख उत्तर दिले. त्याची वैयक्तिक कामगिरी तितकीशी चांगली झाली नसली तरी कर्णधार म्हणून त्यानं त्याचं नेतृत्व सिद्ध केलंय. पहिली कसोटी आपण सपाटून हारलो. तेव्हा तर या कांगारूंना स्वर्ग दोन बोटे उरला. स्मिथ आणि कंपनी तर माजलेल्या वळूसारखी ढुसण्या द्यायला लागली विराटला. पण अत्यंत शांतपणे विराटने या वळूच्या नाकात वेसण घातले. इतके बेमालूमपणे कि त्यांना कळले देखील नाही. कांगारू इतके बिथरले होते की त्यांनी कोणालाच सोडले नाही. शेवटच्या कसोटीत तर स्मिथची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. दुसऱ्या डावात त्यांचा शेवटचा खेळाडू आऊट झाला तेव्हा स्मिथने चक्क शिवी हासडली आणि त्याची ही कृती चक्क कॅमेरामनने मोक्याच्या वेळेला सगळ्या जगाला दाखवली. तिकडे त्यांचा विकेट कीपर जडेजाच्या मागे लागला. जाडेजाने पूर्ण दुर्लक्ष केले आणि कसोटी आपल्या खिशात. पण त्या दोघांचं संभाषण आता BCCI ने जाहीर केलंय. हे बघून तर स्मिथचे अवसानच गळाले. त्याने चक्क जाहीर माफी मागितली. आणि भावनेच्या भरात आपल्याकडून झालेल्या चुकीची माफी मागितली आहे. हाच तो स्मिथ ज्याने सचिनचा अपमान केला होता. मला वाटतं ह्या सगळ्या प्रकारात आपलं भारतीयपण सिद्ध झालंय. त्यांच्या शेरेबाजीला आपण आपल्या अष्टपैलू खेळाने तोडीस तोड उत्तर दिलं. आपण कुठेही घसरलो नाही. आपली शाब्दिक उत्तर देखील कुठेही पातळी सोडून नव्हती. उदाहरण घ्यायचं झाल तर जाडेजाच. जेव्हा त्याला मैदानावर कांगारुच वागण असह्य झाल तेव्हा तो त्यांना इतकंच म्हणाला की उद्या तुम्ही हारल्यावर आपण एकत्र जेवण करू. कांगारूंनी इतका त्रास दिल्यावर कोहलीने चक्क जाहीर केलंय कि कांगारूंचे खेळाडू मैत्रीच्या लायकीचे नाहीत. त्याला असं बोलायला भाग पाडल्यामुळे कांगारूची सर्वत्र छि थु होईल यात शंका नाही. पण यामुळे एक गोष्ट नक्की झालीये कि स्मिथने मैत्रीची एक चांगली परंपरा मोडली आहे. मकग्रा, स्टिव्ह वौ, रिकी पॉंटिंग, शेन वॉर्न हे सर्व शाब्दिक भांडणासाठी ओळखले जातात पण त्यांची भारतीय खेळाडूंसोबत मैत्री देखील होती. सचिन आणि वॉर्न आजही चांगले मित्र आहेत. पण स्मिथ आणि कंपनी या बाबतीत प्रचंड कर्मदरिद्री आहे. सचिनची परंपरा विराट पुढे नेत असताना स्मिथने मात्र ही संधी वाया घालवून त्याच्या देशाचे नाक कापले आहे. कसोटी मालिका तर सोडाच भारतीयांचं मन देखील त्याला जिंकता आलेलं नाही आणि इथेच विराट सर्व अर्थाने त्याच्यासमोर विराट ठरला आहे आणि त्यामुळेच मला आणि प्रत्येक अस्सल भारतीयाला त्याचा अभिमान आहे. बाकी खेळ तर सुरूच राहील.