Category Archives: Uncategorized

उत्क्रांतीचं त्रांगडं-२

पहिल्या भागात आपण पाहिलं कि जीवसृष्टीच्या मानवकेंद्रित असणाऱ्या धर्माच्या संकल्पनांना काही शास्त्रज्ञानी कशा प्रकारे सुरुंग लावले. जीवसृष्टीविषयी आपलं ज्ञान वाढत असताना हे कधीतरी होणारच होतं. पण ह्या सर्वांच्या प्रयत्नांनंतर सुद्धा कितीतरी प्रश्न तसेच होते. जे इतर जीवांच्या बाबतीत झालं ते आपल्या बाबतीत सुद्धा झालं होतं का? आणि असेल तर कसं? हा प्रश्न होता. सगळी जीवसृष्टी कुठल्या नियमाने चालते? त्याच काही सूत्र आहे का? हे काही नवे प्रश्न होते. त्यांची उत्तरं मिळवण्याचे जोरदार प्रयत्न चालू होते. पण बहुतेक जणांची झेप हि मर्यादित होती. ते एका विशिष्ट मुद्द्याला धरूनच स्पष्टीकरण देऊ पाहत असल्यामुळे समान सूत्र काही त्यांना सापडत नव्हतं. ह्या काळात सापडणाऱ्या जीवाश्मांनी खरं म्हणजे सर्वांची गोची करून ठेवली होती. कारण सापडणारे जीवाष्म आणि आजूबाजूला दिसणारे सजीव ह्यांचा संबंध कोणालाच लावता येत नव्हता कारण ते जीवाष्म हे नष्ट झालेल्या प्राण्यांचे होते आणि त्यांचं अस्तित्व कुठेच नव्हतं. त्यामुळे सर्वत्र एक गोंधळाची अवस्था होती. हा सगळा गुंता डार्विनने सोडवला, नुसता सोडवलाच नाही तर सरळ सोपा करून टाकला. अर्थात इतर कुठल्याही सिद्धांताप्रमाणे तो लगेच नाकारल्या गेला, इतकंच काय आजही नाकारला जातो. ह्याउलट अनेकांनी तो पडताळून पाहिला, वेगवेगळ्या फूटपट्ट्या लावून पारखून सुद्धा घेतला आणि सिद्ध केला. ज्याप्रमाणे न्यूटनने आणलेल्या नियमांनी भौतिकशास्त्र समजायला सोपं केलं अगदी त्याच प्रमाणे जीवसृष्टी चालते कशी ह्याच उत्तरं डार्विनने आपल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताने साधं आणि सोपं करून टाकलं. हि थिअरी कशी जन्माला आली त्याची कथा देखील मोठी रंजक आहे. ह्या भागात जाणून घेऊ ती कथा आणि अर्थातच नेमका काय आहे डार्विनचा सिद्धांत ह्या प्रश्नच उत्तर सुद्धा!

कोण होता डार्विन?

पहिल्या भागात उल्लेख केलेलं Erasmus Darwin हे डार्विनचे आजोबा. त्यांनीदेखील हे उत्क्रांतीचं कोडं सोडवण्यात हातभार लावला होता. डार्विनला डॉक्टर करावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती आणि डार्विनने मेडिकल कॉलेजला प्रवेश सुद्धा घेतला पण पहिल्या काही दिवसातच तिथल्या एकंदरीत वातावरणाशी त्याच काही जुळलं नाही आणि त्याने वैद्यकीय शिक्षणाला रामराम ठोकला. त्यानंतर डार्विन केम्ब्रिजमध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी गेला. त्यावेळेस तिथे इतर विषय देखील शिकवत असत. त्यात मात्र डार्विनला चांगलीच रुची निर्माण झाली. तो पदवीधर झाला.

डार्विनचा जगप्रसिद्ध प्रवास
आता डार्विनसमोर काही संधी उपलब्ध होत्या. त्यावेळी युरोपीय देशांमध्ये जगाच्या इतर भागात जाऊन वसाहती स्थापन करणे नाहीतर किमान तिथल्या नैसर्गिक संसाधनांवर ताबा मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती. इंग्लंड अर्थातच त्यावर आघाडीवर असणारा देश होता. ह्यासाठी मोठमोठी जहाजं दूरवरच्या प्रवासातही जात आणि त्यावर विविध विषयाच्या तज्ज्ञांना घेऊन जायची पद्धत असे जसं कि वनस्पतिशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, नकाशे तज्ज्ञ वगैरे. HMS Beagle नावाचं एक जहाज तेलसाठे शोधण्यासाठी जाणार होतं. त्यात तज्ज्ञ म्हणून डार्विन सहभागी झाला. हा ह्या जहाजाचा दुसरा प्रवास. आधीचा प्रवास कप्तानाने आत्महत्या केल्यामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे हा प्रवास कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचा होता. त्यासाठी २ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला पण तो विविध कारणांमुळे तब्बल ५ वर्षे चालला. त्यापैकी दिड वर्षे प्रवासात गेलं आणि उरलेली वर्षे तेलसाठे शोधणे, नकाशे बनवणे ह्या कामात गेली. इथेच डार्विनने जगाच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या प्राणी, कीटक, वनस्पती आणि पक्षी ह्यांच्या नोंदी ठेवल्या. हे सगळं होत असताना एक थिअरी आकार घेत होती. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात ५ आठवडे Beagle हे गॅलेपेगॉस ह्या बेटांवर मुक्कामाला होतं. हि ज्वालामुखीजन्य बेटांची मालिका. ह्यातली बेटं एकमेकांपासून ५०-१०० किमीवर अंतरावर आहेत आणि असं असलं तरी ह्या बेटांवर एकाच जातीच्या प्राण्यांचे विविध प्रकार डार्विनला आढळले. ह्या बेटांवर असणारी विशेष जीवसंपदा म्हणजे महाकाय कासवे, मोकिन्ग आणि फिंच पक्षी. जी कथा न्यूटनच्या डोक्यावर पडलेल्या सफरचंदाची तशीच कथा ह्या फिंच पक्षाच्या बाबतीत डार्विन सोबत सांगितली जाते. त्या पक्षाला पाहूनच डार्विनला उत्क्रांतीची थिअरी सुचली असा एक आरोप केला जातो जो कि अर्थातच अर्धवट आणि बिनबुडाचा आहे. पण असं नक्की म्हणता येईल कि ह्या बेटांवर केलेल्या निरीक्षणातून उत्क्रांतीच्या थिअरीला निश्चित आकार आला.

तिथून आल्यावर डार्विनने सगळी निरीक्षणं व्यवस्थित मांडली. पण थिअरी शब्दबद्ध झाली एका वेगळ्याच घटनेने. हि घटनाच डार्विनच्या थिअरीची सर्वव्यापकता दर्शवते. २ अर्थतज्ज्ञांनी काही मतं मांडली. त्यापैकी ऍडम स्मिथने असं सांगितलं कि उद्योगधंद्यामध्ये असणारी चढाओढ हि अधिक चांगल्या दर्जाची उत्पादने निर्माण करते तर मॅल्थसने आपल्या 'लोकसंख्येची तत्वे' ह्या पुस्तकात असं सांगितलं कि अन्नधान्याची उपलब्धता आणि लोकसंख्या ह्याच्या व्यस्त प्रमाणामुळे त्यासाठी जीवघेणी स्पर्धा निर्माण होते. ह्या दोन गोष्टींच्या एकत्रित कल्पनेतून डार्विनने आपल्या थिअरीला नेमक्या शब्दात बसवलं.

डार्विनने प्रवास केलेलं Beagle जहाज

काय आहे थिअरी?

डार्विनची थिअरीचा पहिला भाग म्हणजे 'Struggle for Existance'! त्यानुसार प्रत्येक सजीवाला जन्मल्यापासून एका अत्यंत जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. हि स्पर्धा असते स्वतःच अस्तित्व टिकवण्याची आणि जगण्याची. ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि पुनरुत्पादन करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. उदाहरणार्थ हरीण. हरणाला एकाच वेळी जंगलात गवत, चारा मिळवण्यासाठी इतर हरणांशी तसेच गवत खाणाऱ्या इतर प्राण्याशी स्पर्धा करावी लागते. जोडीला वाघ, सिंह, लांडगा अशा प्राण्यांपासून स्वतःचा जीव सुद्धा वाचवायचा असतो. हेच वनस्पती, कीटक, पक्षी ह्यांना सुद्धा लागू होतं.

ह्याच्याच जोडीला असते बदलणारी परिस्थिती. ह्या परिस्थितीला जुळवून घेत सजीव जगत असतात. नैसर्गिकरित्या सजीवांमध्ये बदल होत असतात. हे बदल खूप संथ गतीने होतात. ह्यातले जे बदल बाह्य परिस्थितीशी अनुकूल असतात ते टिकतात आणि पुढच्या पिढीत जातात. हि एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. ज्या सजीवांमध्ये हे बदल होत नाहीत ते सजीव नष्ट होतात. थोडक्यात एका अर्थाने निसर्ग गाळण प्रक्रिया करतो. ह्यालाच डार्विनने म्हणले 'नैसर्गिक निवडीचा सिद्धांत'. आता Lamarck च्या सिद्धांताशी तुलना करु. Lamarck ने सांगितलं कि प्रत्येक पिढीत जिराफाची मान थोडी थोडी वाढत आजच्याइतकी झाली आहे. ह्याउलट डार्विन सांगितलं कि प्राप्त परिस्थितीत काही जिराफ हे नैसर्गिकरित्या उंच मानेचे होते. हे जास्त अनुकूल होते आणि म्हणून टिकले बाकीचे नष्ट झाले. उंच मानेचे गुणधर्म पुढच्या पिढीत गेल्यामुळे त्या पिढ्यांमध्ये उंच मानेचे जिराफाच होते. अशा प्रकारे विशिष्ट परिस्थितीत जुळवून घेणारे सजीवच निसर्ग निवडतो. ह्यामुळे जीवाश्मांचा प्रश्न सुद्धा निकालात निघाला. नष्ट झालेले जीव बदलणाऱ्या परिस्थितीत अनुकूल असणारे बदल विकसित न झाल्यामुळे टिकू शकले नाहीत. हेच अगदी मानवाच्या बाबतीत सुद्धा घडलं. डार्विनने गॅलेपेगॉस बेटांवर कासव आणि फिंच पक्षाच्या बाबतीत हे निरीक्षण केलं होतं.

एकाच जातीचे पण वेगवेगळ्या चोचीचे फिंच पक्षी

काही बदल हे जगण्याला आवश्यक नसताना देखील डार्विनला आढळले. त्यांचं स्पष्टीकरण मात्र नैसर्गिक निवड प्रक्रियेने देता येत नाही हे सुद्धा त्याने मान्य केलं आणि त्याच स्पष्टीकरण सुद्धा दिलं. त्यासाठी डार्विनने लैंगिक निवड हा मुद्दा सांगितला. अनेक पक्ष्यांमध्ये माद्या ह्या नराची निवड करतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी तुरा, पिसारा, मधुर आवाज असे अनेक बदल नर पक्ष्यांमध्ये होतात आणि पुनरुत्पादन करण्याची संधी मिळावी ह्यासाठी हे बदल त्यांच्यात पिढ्या दर पिढ्या ह्यावर ऊर्जा खर्च होत राहते.

अशाप्रकारे डार्विनने आपल्या थिअरीद्वारे बऱ्याच अंशी आपली जीवसृष्टी कोणत्या सूत्राने चालते हे दाखवून दिले. बदलणाऱ्या परिस्थितीशी प्रत्येक जीव जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आवश्यक असणारे बदल निसर्गतः सजीवांमध्ये होत असतात. विशेष म्हणजे हे सर्व बदल मानवात सुद्धा झाले आहेत. मायोसीन काळात माणसाच्या उत्क्रांतीची सुरुवात आफ्रिकेत झाली. त्यावेळी हवामान गरम व कोरडे झाल्यामुळे जंगलं नाहीशी होऊन गवताळ प्रदेश निर्माण झाले, त्यावेळी माकडे आणि त्यांच्या प्रजाती झाडावरून ह्या सपाट प्रदेशात आली हाच तो मानव आणि वानर ह्यांचा सामायिक पूर्वज. त्यानंतर साधारणपणे ३०-४० लाख वर्षांपूर्वी ह्या पूर्वजाच्या वंशावळीच्या दोन शाखा झाल्या एक मानव आणि दुसरी चिंपांझी आणि गोरीला. तेव्हापासून ह्या दोन्ही शाखा उत्क्रांत होत आहेत. भविष्यात देखील होत राहतील.

ह्या थिअरीने अशाप्रकारे जीवसृष्टीच्या पसाऱ्याचा गुंता सोडवला. असं असलं तरी काही प्रश्नांची उत्तरं त्यावेळेस मिळू शकली नाहीत पण कालांतराने आनुवंशिक शास्त्राचा विकास होत गेला आणि हि थिअरी अजूनच स्पष्ट झाली. हे प्रश्न, त्यांची उत्तरं आणि ह्या थिअरीला विरोध करणाऱ्या इतर काही थिअरीज ह्याविषयी पाहूया पुढच्या भागात.

फोटो सौजन्य: आंतरजाल

माहितीस्रोत

https://www.livescience.com/474-controversy-evolution-works.html

पुस्तके:
उत्क्रांती- सुमती जोशी
किमयागार- अच्युत गोडबोले
उत्क्रांती- जीवनाची कथा