Monthly Archives: November 2020

Antibiotic Awareness Week-काळाची गरज!

5 वर्षांपासून म्हणजेच 2015 पासून जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात Antibiotic Awareness Week अर्थात प्रतिजैविकांविषयीचा जागरूकता सप्ताह साजरा करते. ह्यावर्षी 18 ते 24 नोव्हेंबर  ह्या कालावधीत हा सप्ताह जगभर साजरा झाला. औषधांच्या प्रतिजैविके ह्या प्रकारावर संपूर्ण वैद्यकीय जगत गेल्या काही वर्षात काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. ज्या औषधांच्या शोधाचं आयुर्मान 100 वर्षे देखील नाही त्यांच्यासाठी इतकी सजगता का असेल असा स्वाभाविक प्रश्न पडू शकतो. विविध रोग, विकार ह्यांच्याविषयी जागरूकता करण्यासाठी जिथे फक्त एक दिवस असतो तिथे प्रतिजैविकांसाठी संपूर्ण आठवडा आहे यातच सर्व काही आलं. पण इतका वेळ का गरजेचा आहे? प्रतिजैविके खरंच इतकी महत्वाची आहेत का? तसं असेल तर आजच्या आधुनिक उपचार पद्धतीमध्ये ह्या औषधांचं नेमकं स्थान काय आहे? जागतिक आरोग्य संघटना आणि इतर कित्येक देशातील आरोग्य संघटना गेल्या काही वर्षात प्रतिजैविकांविषयी इतक्या जागरूक का झाल्या आहेत? ही औषधे इतकी महत्वाची असतील तर आपण काय करणं गरजेचं आहे किंवा आपल्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत? Antibiotics ह्या प्रकारविषयी बरेच समज गैरसमज जवळपास प्रत्येकाच्या मनात असतात. ह्या सप्ताहाच्या निमित्ताने फक्त डॉक्टर,औषधनिर्माते,विक्रेते, संशोधक इतकंच नव्हे तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना देखील प्रतिजैविकांचं महत्व समजावं ह्यासाठी विविध आरोग्य संघटना मेहनत घेत आहेत. प्रतिजैविकांचा इतिहास महत्वाचा आहेच पण ते भविष्यात देखील उपलब्ध असावेत यासाठी वर्तमानात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणं ही काळाची गरज बनली आहे. ती तशी का बनली आहे हे जाणून घेणं म्हणूनच आवश्यक बनलं आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्र हे जसजसं प्रगत होत होतं तसतसं त्याच्या मर्यादा देखील स्पष्ट होत होत्या. मानवी शरीराबाबतचं वाढणारं ज्ञान, उपलब्ध होणारं तंत्रज्ञान हे एकीकडे अनेक रोगांवर, विकारांवर बिनचूक म्हणता येतील असे उपचार निर्माण करत होते तर दुसरीकडे अनेक कठीण शस्त्रक्रिया बिनबोभाट पार पाडल्यानंतर देखील कुशल सर्जन हे रुग्णाला वाचवण्यासाठी धडपडत होते. ह्याच मुख्य कारण होतं, जिवाणू अर्थात बॅक्टरीयाचा होणारा जीवघेणा संसर्ग! शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली तरी पेशंट ह्या संसर्गामुळे दगावत असे. हीच परिस्थिती थोड्याफार फरकामुळे गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत देखील होती. बाळंतपणानंतर होणाऱ्या आई आणि बाळाच्या मृत्यूमागे असणाऱ्या कारणामध्ये हाच संसर्ग बराच वरच्या क्रमांकावर होता. पण हे नेमकं का होतंय हे माहिती नव्हतं. लुईस पाश्चर आणि जोसेफ लिस्टर ही एक संशोधक आणि सर्जनची जोडगोळी तेव्हाच्या फ्रान्समध्ये आपापल्या क्षेत्रात अचाट कामं करत होती. लिस्टर तर ह्या कारणांच्या हात धुवून मागे लागला होता.  सूक्ष्मजीव हे यत्र तत्र सर्वत्र असतात असं पाश्चरला आढळलं होतं. त्याने ह्या प्रश्नावर एक अत्यंत सोपा असा उपाय सांगितला की शस्त्रक्रियेची जागा, ती करणारी माणसे, हत्यारं ही स्वच्छ असू द्या, एकदा वापरल्यावर हत्यारांना गरम पाण्यात व्यवस्थित धुवून घ्या, इत्यादी. ह्या उपायांनी मृत्युदर उल्लेखनीय पातळीवर कमी देखील झाला होता. हळूहळू ही पद्धत स्वीकारण्यात आली आणि रूढ सुद्धा झाली.

पूर्वीच्या काळी होणाऱ्या जीवघेण्या शस्त्रक्रिया

हा सगळा इतिहास पहिल्या महायुद्धापूर्वीचा आहे. पहिल्या महायुद्धात कित्येक मृत्यू हे जंतूसंसर्गामुळेच झाले होते. मधल्या काळात पेनिसिलिन ह्या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लागला. दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत त्याच्या मानवी चाचण्या घेण्यात आल्या आणि युद्धात झालेल्या जखमांमुळे होणाऱ्या जंतुसंसर्गावर नियंत्रण मिळवता आलं. पर्यायानं ह्या कारणामुळे होणारे मृत्यू देखील नियंत्रित आले (ती कथा https://bit.ly/3nQzQyY इथे वाचता येईल). ह्या शोधासाठी सर अलेक्झांडर फ्लेमिंग ह्यांना नोबेल पूरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात त्यांनी एक महत्वाची बाब नमूद केली. त्यांनी स्पष्टच केलं की प्रतिजैविके ही दुधारी तलवार आहेत त्यांचा वापर हा अगदी काटेकोरपणे झाला तरच उपयोग आहे नाहीतर उलटा त्रास नक्की होईल आणि तसं झालं तर जंतूसंसर्गाच्या ह्या राक्षसाला परत बाटलीत घालणं हे महाकठीण असेल. त्यांची ही भविष्यवाणी टाळ्यांच्या गजरात हरवून गेली आणि आज मात्र हा राक्षस भिती वाटावी इतका भयावह झाला आहे. येत्या काही वर्षात आपण परत प्रतिजैविक नसण्याच्या काळात जाऊ अशी भिती आता तज्ञांसोबत डॉक्टर सुद्धा उघड उघड व्यक्त करत आहेत. एकीकडे आपण यकृत, किडनी, हृदय ह्यांच प्रत्यारोपण दिवसेंदिवस अधिक अचूकतेने करत आहोत तर दुसरीकडे हे करत असताना होणारा जंतुसंसर्ग प्रतिजैविकांना दादच देत नाही ही मोठीच समस्या आणि त्याहीपेक्षा डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या आपल्या  वैद्यकीय प्रगतीचा हा डोलारा समर्थपणे तोलून धरणारे हे खांब पोकळ झाले आहेत आणि हा डोलारा कोसळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण ही परिस्थिती इतकी कशी काय बिघडली? ही औषधं उत्क्रांत झालीच नाहीत का? नेमकं घडलं तरी काय? ह्याला कोण जबाबदार आहे? ह्या परिस्थितीवर उपाय तरी काय?

दुसऱ्या महायुद्धात प्रतिजैविकांचं महत्व प्रस्थापित झालं होतं. जगभर पेनिसिलिनचा वापर वाढायला सुरुवात झाली. पेनिसिलिनच्या धर्तीवर विविध सुक्ष्मजीवांपासून नवनवी प्रतिजैविके शोधण्यात आली. ह्यामध्ये औषधी कंपन्या आघाडीवर होत्या. साधारणपणे 1950 ते 1980 ह्या काळाला प्रतिजैविकांचा सुवर्णकाळ मानल्या जातो (Golden Era of antibiotics). आज वापरात असलेली बहुसंख्य प्रतिजैविके याच काळात शोधली गेली. एकाच प्रकारच्या जिवाणूमुळे होणाऱ्या संसर्गासाठी प्रतिजैविकांचे अनेकविध पर्याय उपलब्ध झाले आणि इथेच राक्षस बाहेर यायला सुरुवात झाली, आपण मात्र निर्धास्त होतो.

प्रतिजैविकांचं वैशिष्ट्य हेच त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करत असतं. प्रतिजैविके जिवाणूंना मारतात पण ते दुसऱ्या शरीरात. दुसऱ्या शरीरात जाऊन त्यातही एखाद्या विशिष्ट ठिकाणी म्हणजे जिथे संसर्ग झालेला आहे तिथे वाढत असलेल्या, सुस्त पडलेल्या किंवा दबा धरून बसलेल्या (इतक्या किंवा अधिक शक्यता जंतुसंसर्गाच्या असतात) जीवाणूंना शोधून काढून त्यांना मारून टाकणं किंवा त्यांची वाढ रोखणं हे महत्त्वाचं काम ते करतात. हे करत असताना कधी रुग्णाची प्रतिकारशक्ती मदतीला असते आणि बऱ्याचदा ती नसतेच. अशावेळी आव्हानं जास्त असतात. त्याहीपेक्षा निसर्ग आपलं काम चोख बजावत असतो तो प्रत्येकाला जगण्याची संधी देतो तशी ती जीवाणूंना देखील देतो. कशी ते जाणून घेऊ.

प्रत्येक सजीवामध्ये आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सतत बदल होत असतात. ह्या बदलांचे परिणाम काय होतील ह्याच्या असंख्य शक्यता असतात. हे बदल कधी उपयोगाचे असतात तर कधी उदासीन तर कधी जीवघेणे देखील! जीवाणुदेखील ह्याला अपवाद नसतातच. होतं काय की आजूबाजूला असणाऱ्या प्रतिजैविकांच्या परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी जिवाणूंमध्ये देखील बदल होत असतात, फक्त मानवी शरीरात असतानाच नव्हे तर निसर्गात असताना सुदधा! जर कर्मधर्म संयोगाने (?) ह्या बदलांमुळे ह्या प्रतिजैविकांना तोंड देण्याची क्षमता जिवाणूंमध्ये आली तर मग परिस्थिती बिघडत जाते. हे जिवाणू मग चांगलेच वरचढ होतात आणि एका किंवा अनेक प्रतिजैविकांना दाद देईनासे होतात. इतकंच नव्हे तर हा वारसा ते त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना देखील देतात आणि मग त्यांना रोखणे दिवसेंदिवस कठीण होत जाते. अशा प्रतिजैविकरोधी जिवाणूंच्या संसर्गावर उपचार जवळपास अशक्य होऊन जातात आणि मग अशा संसर्गामध्ये रुग्णाचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत डॉक्टर आपले प्रयत्न सोडत नाहीत. ते रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काही आडवळणांचा नाईलाजाने वापर करतात जसं की रुग्ण जर जास्त वयस्कर नसेल तर प्रतिजैविकांचा जास्तीचा डोस देतात किंवा मग एकापेक्षा अनेक प्रतिजैविके देऊन हा संसर्ग नियंत्रणात ठेवतात. काहीवेळा यश मिळते आणि बऱ्याच वेळेला अपयश!

पण यश जरी मिळालं तरी पुढे अनेक समस्या निर्माण होतात आणि तशा त्या झाल्या देखील आहेत. प्रतिजैविके एकाच वेळी 2 कामं करत असतात. एक म्हणजे अशा जीवाणूंचा नायनाट जे त्यांच्यासमोर टिकाव धरू शकत नाहीत आणि दुसरा म्हणजे अशा जिवाणूंची नैसर्गिक निवड (हे काम अप्रत्यक्षपणे होतं) ज्यांच्यात नैसर्गिकरित्या ह्या प्रतिजैविकांसोबत लढण्यासाठी बदल झाले आहेत. एक तर जिवाणू एकपेशीय असल्यामुळे संख्येने प्रचंड असतात. त्यामुळे त्यांच्यात देखील जगण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. आता जर प्रतिजैविकांमुळे बहुसंख्य जिवाणूंचा नायनाट होत असेल तर जे शिल्लक राहतात त्यांचं फावतं. कारण त्यांना आता जगण्यासाठी स्पर्धा करण्याची काहीही गरज उरत नाही. ते मोकाट सुटतात. प्रतिजैविके त्यांचं काहीही करू शकत नाहीत. नैसर्गिक निवडीच्या नियमांनुसार ह्या जिवाणूंचा वंश वाढायला आणि पसरायला लागतो. एकदा का ह्यांचा जम बसला की प्रतिजैविके त्यांच्यासमोर बापुडी ठरतात. अशावेळी जर एकापेक्षा जास्त प्रतिजैविके वापरली तर अडचणींमध्ये अजून वाढ होते. कारण मग नैसर्गिक निवडीच्या न्यायाने परत एकदा त्यांच्यातल्या बाहुबली जिवाणूंची निवड होते जे एकाच वेळी अनेक प्रतिजैविकांसाठी कोडगे असतात. हे चक्र असंच चालू राहतं आणि एकामागोमाग एक प्रतिजैविक अस्त्र निकामी होत जातात.

खरी काळजीची गोष्ट इथेच आहे. गेल्या काही वर्षात विशेषतः दशकात सुवर्णकाळातल्या अशी अनेक प्रतिजैविकं एक तर धारातीर्थी पडली आहेत किंवा शेवटच्या घटका तरी मोजत आहेत. हे जिवाणू प्रचंड शिरजोर झाले आहेत. त्यांना नामोहरम करण्यासाठी नव्या दमाचे उमेदवार आता उपलब्ध नाहीत. जागतिक स्तरावर अशा नव्या प्रतिजैविकांचं संशोधन आता खूपच कमी होतं. त्याला अनेक आर्थिक कारणं देखील आहेत. पण त्यामुळे ही समस्या आता कल्पनेच्या पलीकडे उग्र बनली आहे आणि त्यामुळेच आता आरोग्य संघटना पुढे आल्या आहेत. विविध उपक्रम, नवनव्या कल्पना वापरून झालेल्या चूका दुरुस्त करणे आणि नव्या चूका टाळणे ह्यामार्फत प्रतिजैविकांचं पानिपत टाळण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हे ठीक आहे पण ह्यात तुम्ही आम्ही काही करू शकतो का असा प्रश्न येईल. उत्तर आहे नक्कीच करू शकतो. पण मग नेमकं काय?

आपल्याकडून झालेल्या चूका समजून घेऊ. आपल्याला ऋतुबदलामुळे जो संसर्ग होतो त्यावेळी आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर आपल्याला संसर्गाची तीव्रता आणि इतर लक्षणे बघून हे निश्चित करतात की आपल्याला प्रतिजैविकांची गरज आहे का आणि असेल तर किती प्रमाणात? पुढच्या वेळेस मात्र आपण स्वतःच डॉक्टर होतो आणि मनानेच प्रतिजैविके घेतो. बऱ्याच वेळेला त्याची गरज सुद्धा नसते पण आपण ते घेतो. डॉक्टर आपल्याला स्पष्टपणे सांगतात की प्रतिजैविके एका विशिष्ट कालावधीसाठी घेणे गरजेचे आहे पण आपण एकतर ते अर्ध्यातच सोडून देतो किंवा मग फरक पडतोय म्हणून जास्त दिवस घेतो. आपल्यासारखीच लक्षणे असणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींना आपण ही प्रतिजैविके घ्यायचा सल्ला देतो. क्षयरोग किंवा टिबी मध्ये जास्त कालावधीसाठी हे उपचार घेणे गरजेचे असताना कित्येक लोक ते अर्ध्यावरच सोडून देतात. डॉक्टर लोकांचं कोणीही ऐकत नाही असंच होतं आणि हळूहळू मग आता उपचार उपलब्ध नाहीत ह्या अवस्थेला हताश डॉक्टर येऊन पोचतात. अशा घोडचूका जगभर लोकांनी केल्या आणि आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

ह्याउलट एक वेगळचं निरीक्षण जगभर नोंदवल्या गेलं आहे. प्राण्यांच्या खाद्यात जर प्रतिजैविकांना मिसळलं तर त्यांचं वजन वाढतं असं आढळल्यामुळे ह्याचे अनिर्बंध प्रयोग झाले आणि अन्नसाखळी मार्फत माणसांच्या शरीरात गरज नसताना प्रतिजैविके जात राहिली. त्यामुळे देखील मूळच्या समस्येत अजून भर पडली. आता ह्यावर निर्बंध आले असले तरी अजूनही हा प्रकार पूर्णपणे बंद झालेला नाही.

अशा अनेक समस्या आहेत आणि त्या कशामुळे आहेत हे जोपर्यंत सामान्य माणसाला समजणार नाही तोपर्यंत येणारा प्रत्येक दिवस हा समस्येला आणखीनच गडद करणार आहे. हे सर्वांना समजावं म्हणूनच WHO हा सप्ताह दरवर्षी साजरा करते. उपलब्ध असलेली प्रतिजैविके काळजीपूर्वक वापरली जावीत म्हणून आता जवळपास सर्वत्र कडक निर्बंध आहेत. आता प्रतिजैविके अंधाधुंद वापरता येणार नाहीत. त्यांची जिथे आणि जितकी गरज आहे तितकाच वापर झाला पाहिजे अशी व्यवस्था निर्माण होत आहे. डॉक्टरांच्या prescription शिवाय आता प्रतिजैविके मिळणं कठीण आहे आणि आपणही त्याचा आग्रह धरता कामा नये, इतकं तर आपण नक्कीच करू शकतो. शास्त्रीय संशोधन तर होतंच राहील पण आता त्यापेक्षा महत्वाचं आहे की आपण नव्या चूका करू नयेत. आपण आपल्या भूमिका उत्तम पार पाडल्या तरी पुरेसं आहे. त्यासाठी आपल्या डॉक्टरांना प्रश्न विचारणं, दिलेल्या उपचारांमध्ये प्रतिजैविकं कोणती आहेत, तो घेताना काय काळजी घ्यायला हवी हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यापेक्षाही ते जे सांगतील ते करणं हे जास्त आवश्यक आहे.

ह्या जिवाणूंविरुद्धची लढाई ही अजब आहे. आपण आघाडी घेतल्यानंतर स्वतःच परतीचे दोर कापून टाकत चाललो आहोत. परत लढुन काही फायदा नाही कारण शत्रू आपल्याला मारून टाकेलच ह्यात शंका नाही पण भिती ह्याची आहे की ती तलवार देखील आपलीच असणार आहे.

काहीही झालं तरी सर फ्लेमिंग ह्यांची भविष्यवाणी खोटी ठरवणं हे एका मर्यादेपर्यंतच आपल्या हातात आहे आणि आपण त्या मर्यादेच्या खूप जवळ पोचलो आहोत इतकं लक्षात राहिलं तरी पुरेसं आहे.

फोटो सौजन्य: गुगल