Monthly Archives: February 2018

सर्दीची शंभरी… सावध ऐका पुढल्या हाका!

सर्दीच्या बाबतीत एक गमतीशीर वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, ते म्हणजे औषध घेतलं तर सर्दी एका आठवड्यात बरी होते आणि नाही घेतलं तर 7 दिवसात बरी होते. वरवर पाहता सर्दीचा एक संसर्गजन्य आजार म्हणून उल्लेख होतो. विषाणूमुळे होणारा सर्वसामान्य त्रास इतकीच सर्दीची ओळख. पण याही पलीकडे इतिहासात सर्दीच्या विषाणूने हाहाकार उडवल्याची उदाहरणं आहेत. एरवी फारसा उपद्रवी नसलेला हा विषाणू किती रौद्ररूप धारण करू शकतो हे या उदाहरणातून दिसतं. त्यामुळे सर्दीच्या विषाणूला शास्त्रज्ञ कधीही दुर्लक्षित करत नाहीत. आता सर्दीची शंभरी म्हणजे काय?तर सर्दीच्या विषाणूचा शोध 100 वर्षांपूर्वी लागला. त्यावर्षी म्हणजे 1918मध्ये ह्या विषाणूने आपल्या ग्रहावर शब्दशः थैमान घातले होते. हे थैमान आज ‘स्पॅनिश फ्लू’ या नावाने ओळखले जाते. याचं वैशिष्ट्य हे की त्या वेळेस जगाच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश इतकी लोकसंख्या या साथीत नष्ट झाली होती, म्हणजे साधारणतः 50 दशलक्ष. आज आपल्याला आश्चर्य वाटेल की फक्त सर्दी इतकी घातक ठरू शकते?पण शास्त्रज्ञ थोडा वेगळा प्रश्न विचारतात..तो म्हणजे आज 100 वर्षांनंतर आपण ह्या विषाणूवर विजय मिळवला आहे का?आणि दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक येतं. या माहितीवरून बरेचसे प्रश्न आपल्या मनात उमटले असतील. ते स्वाभाविक पण आहे म्हणा. त्यातला महत्वाचा प्रश्न हा नक्की असणार की सर्दी इतकी भयंकर असू शकते का?आणि असेल तर हे कसं शक्य आहे?हे समजून घेण्यासाठी ह्या विषाणूची रचना समजून घेणं आवश्यक आहे. सर्दीचा विषाणू हा 4 प्रकारचा असतो. A,B, C आणि D. यापैकी D प्रकारचा विषाणू प्राण्यांमध्ये आजार पसरवू शकतो, मानवाला याचा काही त्रास होत नाही.(ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे). C हा प्रकार देखील फार धोकादायक मानल्या जात नाही. A म्हणजे डोकेदुखी. आतापर्यंत जो काही धुमाकूळ सर्दीने घातलाय त्यात ह्या A चा वाटा सगळ्यात जास्त आहे. हा प्रकार तसा लहरी आणि म्हणूनच जास्त धोकादायक. थोडक्यात सांगायचं तर A चे अजून 2 उपप्रकार आहेत. HA आणि NA. Hemagglutinin आणि neuraminidase. ही खरं म्हणजे प्रथिने. ही प्रथिने आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला आव्हान देतात. ही प्रथिनेच या विषाणूची खरी ताकद आहेत. यातल्या HA चे 16 तर NA चे 9 प्रकार आतापर्यंत सापडले आहेत. हे विविध प्रकार एकमेकांसोबत मिसळून एकूण 144 विविध प्रकारचे विषाणू बनू शकतात. उदाहरणार्थ H1N1, H3N2, H2N1, असं काहीही. त्यात अजून हे विषाणू यांची जनुकीय रचना सतत बदलत असतात त्यामुळे यातला कुठलाही विषाणू प्रचंड धोकादायक असू शकतो. अशाप्रकारे सर्दी कधीही जीवघेणी बनू शकते. आणि तशी ती इतिहासात बनली देखील आहे. म्हणजे जर का यातल्या एखाद्या तात्कालिक विषाणूच्या प्रकारची लस बनवली तरी ती फार काळ तग धरू शकत नाही. कारण लगेच नवीन जनुकीय रचना किंवा HA आणि NA च एखादं नवीन combination जुन्याची जागा घेतं आणि मग ही लशीची परिणामकारकता खूप कमी होते किंवा निरुपयोगी देखील. गेल्या काही वर्षात या लशी फक्त 60%च परिणाम दाखवू शकल्या. Center for disease control अर्थात CDC ही अमेरिकेतील आणि जगातील आरोग्य क्षेत्रातील महत्वाची संस्था. गेल्या 5 वर्षात 2 वेळेस त्यांनी असं जाहीर केलं की सध्या उपलब्ध असलेली लस आणि विषाणूचा प्रकार वेगवेगळा असल्यामुळे ही लस उपयोगाची नाही. यावर तुम्हाला अंदाज आला असेल की हा विषाणू किती बेभरवशाचा आहे ते. त्यामुळे सगळ्या प्रकारांवर काम करू शकणारी एकच लस बनवणं हे खूप मोठं आव्हान आहे जे अजून तरी नजरेच्या टप्प्यात नाही.

शास्त्रज्ञ ही लस बनवण्यासाठी इतके का आग्रही आहेत?असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. पण जर गेल्या 100 वर्षातील या विषाणूच्या साथी पहिल्या तर सहज लक्षात येईल तुमच्या. 1918च्या H1N1 साथीनंतर 1957 मध्ये H2N2 ची साथ पूर्व आशियामध्ये पसरली यावेळी 20 लक्ष लोकांचा बळी गेला याच नाव ठेवण्यात आलं ‘एशियन फ्लू’. त्यानंतर 1968 मध्ये परत एकदा साथ आली. यावेळी ती चीनमध्ये सुरू झाली आणि सर्वत्र पसरली. यावेळेस प्रकार होता H3N2. 2 वर्ष टिकलेल्या या साथीत 40 लाख लोक गेले. यावेळेस त्याला हॉंगकाँग फ्लू असं नाव देण्यात आलं. त्यानंतर हा विषाणू नवीन रुपात आला 2004 मध्ये. यावेळेस त्याचा उगम होता कोंबड्यांमध्ये. हो कोंबडीमधून माणसामध्ये हा विषाणू सक्रिय झाला. हा धक्का नवीन होता. खर म्हणजे 1997 मध्येच व्हिएतनाम आणि थायलंड मध्ये याची सुरुवात झाली होती पण 2004 मध्ये त्याची सक्रियता वाढली. याचं वर्गीकरण H5N1 असं झालं आणि नाव बर्ड फ्लू. यावेळेस व्याप्ती जरा जास्त होती, तब्बल 10 देशांमध्ये. पण या विषाणूच हे रूप पूर्णपणे धक्कादायक होतं. हा प्रकार पूर्णपणे समजून घेत असतानाच या विषाणूने 2009 मध्ये अजून एक हल्ला केला. पुन्हा मती गुंग होण्याचा अनुभव आपण घेतला. खर म्हणजे याचा प्रकार होता H1N1, तोच 1918 वाला. पण यावेळेस याच जनुकीय रचना त्याच्यापेक्षा खूपच भिन्न होती. हे समजत नव्हतं. काही वेळाने लक्षात आलं की हा एक पूर्णपणे नवीन विषाणू होता जो डुक्कर, बर्ड आणि माणूस यांच्या विषाणूंच्या एकत्रिकरणातून निर्माण झाला होता. त्यामुळे याच नाव ठेवण्यात आलं स्वाईन फ्लू. यावेळेस तो अमेरिका खंडात उदयाला आला पण परत एकदा तो आशिया खंडातच फोफावला. त्यातही महाराष्ट्रात त्याच बस्तान चांगलंच बसलं हे देखील नवीनच होत. याआधी असं एका विशिष्ट भागातच सर्दीने आपला मुक्काम दीर्घकाळ केल्याचा इतिहास नव्हता. त्याहीपलीकडे तेव्हापासून दरवर्षी कमी जास्त प्रमाणात याच्या केसेस होत असतात. हा प्रकार देखील नव्याने समोर येतोय.

एक महत्वाचा निष्कर्ष गेल्या 100 वर्षात खात्रीने काढता येऊ शकतो. ह्या विषाणूचा प्रवास आशिया खंडात विशेषकरून भारतीय उपखंडात जास्त चांगला होतो. इथली भौगोलिक परिस्थिती याच्या वाढीसाठी जास्त चांगली आहे. आपल्यासाठी खर म्हणजे ही काही चांगली बातमी नाही. पण आपण या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही. इतर प्रगत देश या बाबीला जास्त गांभीर्याने घेण्याचं कारण म्हणजे त्यांचा 2004चा अनुभव. तेव्हा हा विषाणू 10 देशांमध्ये पसरण्याचं कारण म्हणजे वाढलेले जागतिकीकरण. 1957 आणि 1968 च्या तुलनेने जागतिकीकरण खूप वाढले आणि लोक जगभर फिरायला लागले. त्यांच्यासोबत हा विषाणू सर्वत्र पसरला. हे भविष्यात देखील होऊ शकतं याची कल्पना असल्यामुळे याचा अभ्यास इतरत्र जास्त होतोय. त्याचबरोबर वाढणार जागतिक तापमान या विषाणूला पोषकच ठरतंय. याच्या साथीचा कुठलाही एक विशिष्ट असा पॅटर्न नाही. त्याचा उगम कसाही होऊ शकतो. इतकीच माहिती 100 वर्षात आपण मिळवू शकलो. फ्लूचा अभ्यास अजून चालूच आहे. पोलिओ, देवी यासारखे विषाणू आपण प्रभावी लस आणि प्रयत्नांनी जवळपास नामशेष केले पण वरवर साधा वाटणारा फ्लू आपल्याला अजूनही हुलकावण्या देतो आहे. आपल्या प्रयत्नांना भविष्यात नक्कीच यश येईल अशी आशा आपण नक्कीच बाळगू शकतो. नाहीतर आपल्याला माहिती आहेच सर्दी औषध न घेताही बरी होते.